File Photo : MHADA
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 2030 सदनिकांकरीता सुमारे एक लाख तेरा हजार अर्जदारांचा लाभलेला प्रतिसादावरून मुंबईतील परवडणार्या दरातील घरांची वाढती मागणी अधोरेखित होत आहे. या मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवडयाचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.
समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर शहरातील पायाभूत सुविधांचे नियोजन देखील सुलभरित्या करता येणार आहे म्हणूनच त्यांत दाटीवाटीने वसलेल्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा समूह पुनर्वसन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प व काळाचौकी अभ्युदयनगर वसाहत, जोगेश्वरी येथील पीएमजी प्रकल्पातील इमारतींचा पुनर्विकास तसेच म्हाडा अभिन्यासातील जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासातून मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गृहसाठा नजीकच्या भविष्यात निर्माण होणार आहे. याद्वारे सर्वसामान्यांसाठी मुंबईत हक्काची घरे उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली.
म्हाडाच्या या सोडतीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह यांनी म्हाडाच्या नूतन संगणकीय सोडत प्रणालीचे कौतुक करताना सांगितले की, संगणकीय सोडत प्रणाली पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित करणे हे मोठे आव्हान आहे मात्र हे म्हाडाने शक्य केले आहे. या पारदर्शक सोडतीवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली पसंती आणि विश्वास नोंदविला आहे. म्हाडाच्या सोडतीतील निर्णयावर आजवर नागरिकांनी देखील सहमती दर्शविली आहे म्हणूनच म्हाडा आणि विश्वास हे समीकरण सक्षमतेने मांडले जात आहे, असे त्या म्हणाल्या.