फोटो सौजन्य- सोशल मीडिया
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा राज्य शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार असून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे डॉ.सदानंद मोरे असून या कार्यक्रमात डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे. दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर), पाचवा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसर, सयानी मार्ग, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा पाश्चिमात्य आणि भारतीय ज्ञान परंपरांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचे हे सर्व दुर्लभ वाङ्मय एकत्रित स्वरुपात 18 खंडांमध्ये प्रकाशित केले आहेत.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विद्यापीठे, साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कथांचे अभिवाचनʼ हा कार्यक्रम, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्याभिवाचनʼ हा कार्यक्रम, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याख्यान व अभिवाचनʼ हा कार्यक्रम, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी, जि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याखान, परिसंवाद व ग्रंथप्रदर्शनʼ हा कार्यक्रम, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवलेखक कथालेखन कार्यशाळा असे विविध कार्यक्रम शैक्षणिक संस्थाद्वारे आयोजित केले गेले आहेत.