म्हाडाचे CEO संजीव जयस्वाल (फोटो- ट्विटर)
मुंबई: नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) प्रशासनाने ‘म्हाडा’च्या मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यालयांमध्ये या कृती आराखड्याची तत्परतेने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार म्हाडामध्ये आज व उद्या स्वच्छता मोहीम व अभिलेख वर्गीकरण करून तपासाअंती नष्ट करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज स्वतः या म्हाडा कार्यालयातील प्रत्येक कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष सुमारे तीन तास पाहणी करीत आढावा घेतला. या पाहणी दरम्यान संबंधित कर्मचार्यांना कार्यालयामधील संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे आदी जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट लावण्यात यावी, कार्यालयाच्या आवारात असणारी जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या निर्देशानुसार म्हाडामध्ये आज व उद्या अशी दोन दिवस सदर विशेष मोहीम राबविण्यात येत असून कार्यालयीन सुटीच्या दिवशी म्हाडाच्या मुंबईस्थित मुख्यालयात आज सुमारे ७०० अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
हेही वाचा: सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ‘Mhada’ सदैव तत्पर; कोकण मंडळात 117 भूखंडांचा निकाल जाहीर
आजच्या या मोहिमेत म्हाडाच्या मुंबईस्थित प्रत्येक कार्यालयातील अभिलेखाचे अ, ब, क असे वर्गीकरण करण्याचे काम करण्यात येत असून ड वर्गातील अभिलेख नष्ट करावयाचे काम करण्यात येत आहे. आजच्या मोहिमेत सुमारे एक लाख नस्त्यांचे वर्गीकरण करण्यात आले असून अभिलेखाचे निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखन प्रक्रिया वेगाने करण्यात येत आहे. सदर कामासाठी म्हाडा कर्मचार्यांना ५०० हून अधिक मजूर, सफाई कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी वाहने, इतर साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जयस्वाल यांनी म्हाडा मुख्यालयाच्या पाच मजली इमारतीतील प्रत्येक कार्यालयांस भेट दिली. कार्यालयात तसेच कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेत अडचण निर्माण करणारे व निकामी झालेले फर्निचर व इतर अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्य अभियंता श्री. महेश जेस्वाणी यांच्या निर्देशाखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे भवनातील स्वछता मोहीम राबविण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. म्हाडा कार्यालय नागरिकांसाठी आज खुले नसले तरी सर्व कर्मचारी उपस्थित राहून कार्यालयातील स्वछ्ता मोहिमेचे कार्य पार पाडताना दिसत होते.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, नागरिकांचे जीवन सुखकर करणे या बाबीवर प्राधान्य देण्यात आले आहे. शासकीय कर्मचार्यांच्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असल्यामुळे नागरिकांना देण्यात येणार्या सुविधांना अधिक महत्व दिले गेले पाहिजे, असे निर्देश जयस्वाल यांनी याप्रसंगी दिले. जयस्वाल म्हणाले की, म्हाडास भेट देणार्या अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच त्यांना पिण्याचे पाणी भवनात ठिकठिकाणी व प्रत्येक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात यावे. अधिकार्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवावी जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येऊ शकेल. तसेच गृहप्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी अधिकार्यांनी फिल्ड व्हिजिट घेणे आवश्यक असल्याचे सांगत फिल्ड व्हिजिट आठवड्याच्या शेवटी निश्चित कराव्यात व याबाबत नागरिकांना अवगत होईल असे नियोजन असावे , असे निर्देश याप्रसंगी दिले.
हेही वाचा: MHADA News: “म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख…”; DCM एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन
म्हाडा हे एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने कार्यालयास भेट देणार्या नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र (Citizen Facilitation centre) उभारण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले आहेत. आज जयस्वाल यांनी या केंद्राच्या उभारणीच्या कामाचा आढावा प्रत्यक्षस्थळी भेट देऊन घेतला. तसेच विझीटर मॅनेजमेंट सिस्टमचा देखील त्यांनी यावेळेस आढावा घेतला. तसेच या पाहणी दौर्यादरम्यान त्यांनी म्हाडातील प्रांगणात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला देखील भेट दिली व तेथे महिलांकरिता असलेल्या सुविधा व सुरक्षा नियोजनाचा देखील आढावा घेतला.
म्हाडातील विविध मंडळाकडून नागरिकांना नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांच्या सज्जतेचा आढावा देखील त्यांनी आज घेतला. ते म्हणाले की, म्हाडाचे संकेतस्थळ सर्व माहितीने परिपूर्ण असावे. जेणेकरून माहितीचा अधिकार वापर करून नागरिक जी माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. तसेच म्हाडाचे संकेतस्थळ हे जनतेशी संवाद साधणारे असावे जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण ऑनलाइन होईल. प्रत्येक विभागाने नागरिकांची सनद आपल्या कार्यालयाबाहेरील दर्शनी भागात लावावी, असे निर्देशही विभाग प्रमुखांना यावेळी दिले. तसेच याप्रसंगी कागदविरहित प्रशासनावर भर देणारी ई–ऑफिस प्रणालीच्या कार्यक्षमतेची देखील त्यांनी आढावा घेतला.