Nanded Politics: नांदेडमध्ये मध्यरात्री राजकीय भूकंप! श्रीकांत शिंदे अन् प्रतापराव चिखलीकरांची 'हॉटेल'मध्ये गुप्त भेट
सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या नांदेड दौऱ्यावर असून, त्याच संधीचा फायदा घेत आमदार चिखलीकर यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अशा परिस्थितीत चिखलीकर आणि शिंदे यांच्यात झालेल्या या दीर्घ चर्चेमुळे आगामी निवडणुकीची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना चिखलीकर यांनी सांगितले की, मुंबईतील पूर्वीच्या भेटीत त्यांनी डॉ. शिंदे यांना नांदेड भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, दिवसभराचे कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असल्याने सकाळी भेट घेण्याचे ठरले होते. स्वतःचा घरगुती कार्यक्रम असल्याने सकाळी बाहेरगावी जावे लागणार असल्यामुळे त्यांनी रात्रीच हटिलवर जाऊन भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
आम्ही दोघे लोकसभेचे सहकारी
आम्ही दोघेही लोकसभेत सहकारी म्हणून काम केले आहे.
महायुतीचे घटक पक्ष म्हणून नांदेडमध्ये आलेल्या नेत्याचे स्वागत करणे हीच या भेटीमागची भूमिका होती,’ असे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी निवडणुकांबाबत काही राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या भेटीतून महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या राजकीय भेटीचे वेगवेगळे तर्कविर्तक लढविले जात आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत युतीचा यशस्वी प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर आता विधान परिषद निवडणुकीतही नवे राजकीय समीकरण आकार घेणार का, याबाबत नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या भेटीचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि आगामी राजकीय शह-काटशहाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.






