खडकवासला येथील एनडीएच्या हबीबुल्ला हॉलमध्ये शुक्रवारी (ता. २९) हा भव्य समारंभ पार पडला. यावेळी कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, प्राचार्य डॉ. विनय दीप, एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा, वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच कॅडेट्सचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बेदी यांनी आपल्या भाषणात एनडीएमधील प्रशिक्षणाचे कौतुक करताना सांगितले की, येथे केवळ असामान्य विद्यार्थीच प्रवेश मिळवतात आणि कठोर प्रशिक्षणातून घडलेले हे कॅडेट्स भविष्यात विकसित भारताचे शिल्पकार ठरणार आहेत. बदलत्या युद्धनीती, सायबर क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि नेतृत्वातील प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी कॅडेट्सना राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याचा संदेश दिला.
‘नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे, तर कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारणे, प्रामाणिक निर्णय घेणे आणि स्वतःच्या कृतीतून उदाहरण निर्माण करणे होय,’ असे त्या म्हणाल्या. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रनिष्ठा आणि तयारीचे महत्त्व स्पष्ट केले. ‘२०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात प्रवेश करेल, तेव्हा आजचे हे कॅडेट्स देशाच्या महत्त्वाच्या नेतृत्वपदांवर असतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Pune News : पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल होणार तर सिंहगड किल्ल्याजवळ…
कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जागतिक संघर्षांतून तंत्रज्ञानाचा वाढता वापर स्पष्ट झाला आहे. अशा काळात लष्करी अधिकाऱ्यांनी विद्वान योद्धा म्हणून स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. पदवी हे शिक्षणाचा पूर्णविराम नसून निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यामुळे छात्रांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षेसारख्या नव्या क्षेत्रांचा अभ्यास सुरू ठेवावा.’
प्राचार्य डॉ. विनय दीप यांनी प्रबोधिनीचा वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर करताना, ‘एनडीएचे उद्दिष्ट छात्रांमध्ये केवळ घोकंपट्टी नव्हे, तर विश्लेषणात्मक कौशल्ये, निर्णयक्षमता आणि देशप्रेम विकसित करणे आहे,’ असे सांगितले.
दरम्यान, विविध शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या छात्रांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. बी.एससी शाखेत प्रथम आलेल्या पियुष रौतेला याला ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’, बी.एससी कॉम्प्युटर सायन्समध्ये अव्वल ठरलेल्या रणविजय त्यागी याला ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी’, कला शाखेत प्रथम आलेल्या सुशांत वर्मा याला ‘चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी’, तर बी.टेक शाखेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मन्नेला नितीन याला ‘सीआयएससी ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले.






