संग्रहित फोटो
रायगड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट होती. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. त्याला या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. यामुळे विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असं सांगत त्यांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे. आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
धनंजय मुुंडे नेमकं काय म्हणाले होते?
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या अखेरीस धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले.
भुजबळांनी मुंडेंना दिला सल्ला
धनंजय मुंडे यांच्या मागणीची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी लगेच घेतली. भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडे तुम्हाला काय काम द्यायचे ते पक्ष आणि अजितदादा ठरवायचे तेव्हा ठरवतील. पण त्याआधी तुम्ही एक काम करा. आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी जो वारसा दिला आहे, तो संभाळा. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण धोक्यात आणले गेले आहे. ते ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काम करा. लोकांमध्ये जाऊन जनजागृती करा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
हे सुद्धा वाचा : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत