महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २४ प्रभागांतील ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात होते. निकालानुसार भाजपाने ७८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर काँग्रेसला १३ जागा, शिवसेनेला केवळ ३ जागा आणि अपक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले.
निवडणुकांची घोषणा झाल्यापासून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील युतीचा वाद उघडपणे समोर आला होता. त्यानंतर भाजपाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. नरेंद्र मेहता यांनी वारंवार असा दावा केला होता की, मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला मिळालेली सत्ता ही भाजपामुळेच होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या या निकालातून शहरावर कोणाचे राज्य आहे आणि सत्ता कोण काबीज करू शकते, हे भाजपाने कृतीतून दाखवून दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.B
प्रभागनिहाय निकाल (ठळक)
प्रभाग १ ते ८, १०, १२, १३, १५ ते १८, २०, २१, २३ – भाजपाचा दबदबा
प्रभाग ९, १९, २२ – काँग्रेसचे वर्चस्व
प्रभाग ११ – भाजप ३, शिवसेना १
प्रभाग १४ – भाजप ३, अपक्ष १
प्रभाग २४ – शिवसेना २, काँग्रेस १
एकूण निकाल:
भाजप – ७८
काँग्रेस – १३
शिवसेना – ३
अपक्ष – १
भाजपचे मीडिया प्रभारी बिपिन गुप्ता यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाला ५० जागाही मिळणार नाहीत आणि नरेंद्र मेहता ट्रॅफिक हवालदार होतील, असे आरोप केले होते. आजच्या निकालानंतर प्रत्यक्षात कोणाला ट्रॅफिक हवालदार व्हावे लागेल, हे जनतेने स्पष्ट केले आहे.”
भाजप नेते रणबीर वाजपेयी म्हणाले, “मीरा-भाईंदर शहर हे भाजपाचेच आहे. कुणीही येऊन दादागिरी करू नये, असा स्पष्ट संदेश जनतेने दिला आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास भाजपावरच असल्याचे आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
या निकालामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी निर्णायक धोरणे राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






