File Photo : Solapur ZP
सोलापूर : “खोटं बोल पण रेटून बोल’ अशी एक मराठीत म्हण आहे. माहिती चुकीची का असेना पण वेळ मारून नेण्यासाठी काहीजण या म्हणीचा प्रत्यय येईल असा वापर करताना दिसून येतात. अगदी तसाच किस्सा जिल्हा परिषदेच्या बाबतीत घडला आहे. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडरवरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. यावेळी सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलेले उत्तर व आता पाणीपुरवठा विभागाने चौकशी समितीला दिलेली माहिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा ४ ऑक्टोबरला झाली. या सभेत जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेच्या टेंडरवरून बराच गोंधळ झाला होता. आमदार सुभाष देशमुख यांनी यावर लक्षवेधी केली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनच्या योजनेचे टेंडर मॅनेज करून दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार यशवंत माने यांनीही आक्षेप घेतला होता. पालकमंत्री विखे- पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे.
आता या चौकशी समितीला पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी फायलींचा अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये १९० टेंडरपैकी १४० टेंडर मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण डीपीसीच्या सभागृहात मात्र सीईओ दिलीप स्वामी यांनी तक्रार आल्यावर एकही टेंडर मंजूर केले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता कोणाचे खरे असा चौकशी समितीला प्रश्न पडला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित पाहिली मागविले असल्याचे अधीक्षक अभियंता माळी यांनी सांगितले.
आमदार यशवंत माने यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी चौकशी समितीने या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी करावी, अन्यथा चौकशी समितीसाठीच आणखी एक चौकशी समिती नेमली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
वेळ मारून नेण्याचा प्रयत्न…
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणीपुरवठ्याचा टेंडरचा विषय चांगलाच गाजला. यावेळी सर्व आमदारांनी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना धारेवर धरले. उत्तर देताना सीईओ स्वामी यांनी तक्रार आल्यावर आपणही एक चौकशी समिती नेमली आहे व एकही टेंडर मंजूर केले नाही असे उत्तर दिले आहे. सभागृहात सीईओ स्वामी यांनी बोललेली व्हिडिओक्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहेच. वास्तविक त्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने याबाबत काहीही चौकशी केली नसल्याचे आता सांगण्यात येत आहे. केवळ वेळ मारून नेण्याचा हा प्रयोग होता, असेही आता बोलले जात आहे.
असे आहे उत्तर….
सीईओ स्वामी यांनी सभागृहात या प्रश्नाला उत्तर देताना कोणताही ठेकेदार माझ्या ओळखीचा नाही. याबाबत तक्रारी आल्यावर चौकशी समिती नेमली आहे. आक्षेप असलेले काम थांबविले आहे. एकही टेंडर मंजूर केलेले नाही. टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पाडली जाईल तसेच एकही टेंडर मंजूर केलेले नाही.