कल्याण : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानांतर्गत `एक तास स्वच्छतेसाठी’ उपक्रमांतर्गत कल्याण पूर्व १४२ विधानसभा मतदारसंघातील चक्कीनाका ते तिसाई मंदिर, श्री मलंग रोड, कोळशेवाडी म्हसोबा चौक व जरीमरी मंदिर अशा विविध ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता अभियान संपन्न झाले. या स्वच्छता अभियानात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव, सहा. आयुक्त थोरात, हेमा मुंबरकर, सविता हिले आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था कल्याणचे शिक्षक व विद्यार्थी तसेच पतंजली योग शिबीर संघटना तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, माजी अभिमन्यु गायकवाड, विक्रम तरे, माजी नगरसेविका मोनाली तरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“कचरा उचलण्याचा ठेका घेणारे ठेकेदार राजकीय लोकांच्या सहभागाने भ्रष्टाचार करत आहेत यामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे असा थेट आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केला. शहरातील अस्वच्छतेला जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या समस्येला महापालिका पूर्णपणे जबाबदार नसून प्रत्येक नागरिकाच्या मागे महापालिका राहू शकत नाही. महापालिकेकडून दररोज कचरा उचलला जातो मात्र सर्वसामान्य नागरिक गाडीतून जाता जाता कुठेही कचरा फेकतात नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की जिथे कचरा टाकायचा तिथेच तो टाकला पाहिजे मात्र असे होताना दिसत नाही तर दुसरीकडे टेंडर घेणारे ठेकेदार विशेषतः कचऱ्याचे टेंडर घेणारे ठेकेदार हे राजकीय लोकांच्या आशीर्वादाने टेंडर मिळवतात त्यामुळे त्यांना काम करण्याची परवा नसते परिणामी कचराकुंड्या भरून जातात तरी त्या उचलल्या जात नाहीत यामुळे शहराच्या अस्वच्छतेला ठेकेदार आणि राजकीय लोकच जबाबदार असल्याचे वक्तव्य आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर केले.”