सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ : लोणावळा शहरातील प्रमुख प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय होऊनही नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम १० मार्चपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, जर काम वेळेत सुरू झाले नाही, तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला.
खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेच्या उर्वरित पैशांची तात्काळ पूर्तता करून जागा ताब्यात घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कोणतेही राजकारण अथवा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला. लोणावळा शहराच्या पर्यटनवाढीसाठी वळवण तलावाच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील ५९ टक्के खर्च नगरपरिषद करेल, तर उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून दिला जाईल, असे शेळके यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी लवकरच मंजूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेळके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम दर्जेदार सुरू आहेत. शहरातील इतर विकास कामेही अशाच पद्धतीने व्हावीत, असे निर्देश त्यांनी दिले. शहर सौंदर्यीकरण व अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आदेश त्यांनी दिले. शहराच्या सौंदर्याचा विचार करून १० वर्षांपेक्षा जुन्या टपऱ्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना हटवू नये, परंतु नव्याने बसवलेल्या अनधिकृत टपऱ्या १५ दिवसांत हटवाव्यात, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. लोणावळा जनसंवाद दौऱ्यात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, भाजपा, मनसेसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का? ‘त्या’ प्रकरणावरुन मुरलीधर मोहोळ संतापले
बैठकीतीम महत्वाच्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश
खंडाळा येथील रहिवाशांना घरकुल, रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, महात्मा फुले भाजी मंडईचा विकास करणे, रामनगर येथील गायरान जागा घरकुल योजनेसाठी वापरणे, शहरात CCTV बसवणे, अनुकंपा तत्वावरील वारसांना नोकरी देणे, इंदिरानगर पोलिस क्वार्टरजवळ रस्ता बांधणी करणे, खंडाळा येथील जिम साहित्य बसवणे, नवीन अंगणवाडी इमारती बांधणे, शहरातील स्वच्छता आणि अनधिकृत पाणीपुरवठा कनेक्शन हटवणे आदी सर्व मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.