कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात अभ्यासिका उभारली आहे. या अभ्यासिकेची फी वाढविल्याने येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह मनसे देखील आक्रमक झाली आहे. मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या शिष्टमंडळाने या अभ्यासिकेत जाऊन अभ्यासिका चालविणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला. तसेच केडीएमसी मुख्यालयात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत विद्यार्थ्यांची समस्या मांडत या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना माफक दरात सुविधा पुरविण्याची मागणी केली.
सन २०१० साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कै. खासदार प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. याठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात आले होते. काही वर्षानंतर हे केंद्र बंद झाल्याने केडीएमसीने याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली. या अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांकडून २०० रुपये फी आकरण्यात येत होती. मात्र हि अभ्यासिका चालविण्यासाठी खाजगी संस्थेला दिल्यानंतर संबंधित संस्थेने या अभ्यासिकेच्या फी मध्ये वाढ करून ५०० रुपये फी केली.
या अभ्यासिकेत एमपीएससी युपीएससी, पोलीस भरती, इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने त्यांना हि फी भरणे कठीण होणार आहे. इतर खाजगी अभ्यासिकांमध्ये दिड ते दोन हजार रुपये फी आकारली जात असल्याने तेथे देखील अभ्यास करणे या विद्यार्थ्यांना शक्य नाही. ही बाब या विद्यार्थ्यांनी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांना सांगितली असता त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाह या अभ्यासिकेत धाव घेतली. यावेळी या संस्थाचालकाला जाब विचारत विद्यार्थ्यांना दोनशे रुपयांतच सुविधा देण्याबाबत सांगितले.
तर केडीएमसी मुख्यालयात जात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला. ही अभ्यासिका महापालिकेनेच चालवावी, याची देखरेख पालिकेने ठेवून माफक दरात विद्यार्थ्याना लागणाऱ्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली. याला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्षा नयना भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, विभाग प्रमुख कपिल पवार, गणेश लांडगे, संदीप पंडित, महेश बनकर, अभिजीत मालुंजकर, विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.