मान्सून 3 जूनपासून नागपूरसह विदर्भात होणार दाखल? हवामान विभागाने म्हटलं...
नागपूर : मान्सूनने अपेक्षेपेक्षा 8 दिवस आधीच केरळमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. हवामानाचा मूड कायम राहfला तर 1 ते 3 जूनदरम्यान नागपूरसह विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळहून मान्सून येथे पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 दिवस लागतात. परंतु, 2-4 दिवसांनी उशिरा आला तर 3 जूनपर्यंत मान्सून शहरात येऊ शकतो.
शहरात मान्सूनपूर्व पाऊस आधीच सुरू झाला आहे. हवामान खात्याने 24 मे रोजी केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जून आहे. 2009 मध्ये मान्सून 23 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता आणि यावर्षी तो 24 मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातील काही किनारी भागात 2-3 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मान्सून ढगांचे आगमन झाल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत ते नागपूरसह विदर्भात सक्रिय होतो.
गेल्या वर्षी 2024 मध्ये, मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला आणि नागपूरसह विदर्भात पोहोचण्यासाठी त्याला 21 दिवस लागले. 20 जून रोजी मान्सूनचे ढग येथे दाखल झाले होते. परंतु, जर मान्सून त्याच्या गतीने सुरू राहिला तर तो 6 ते 10-11 दिवसांत विदर्भात पोहोचेल. 2021 मध्ये 3 जून रोजी पोहोचल्यानंतर, फक्त 6 दिवसांत 9 जून रोजी नागपुरात मान्सून धडकला होता. 2015 मध्ये केरळहून येथे पोहोचण्यासाठी 9 दिवस लागले. 5 जून रोजी केरळमध्ये धडकल्यानंतर, 14 जून रोजी नागपूरसह विदर्भात मान्सून दाखल झाला होता.
दरम्यान, 2018 मध्ये केरळहून येथे येण्यासाठी 10 दिवस लागले. यावेळी वेग पाहता मान्सून 8 दिवसांत प्रवेश करण्याची शक्यता आहे. चोरपावलाने प्रवेश झाला होता. यावेळी मान्सून अनुकूल राहील. या काळात काही अडचण आली नाही तर 1 ते 3 जूनपर्यंत नागपूरकर पावसाळ्याचे स्वागत करतील.
2017 मध्ये झाले विलंबाने आगमन
गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर 2017 मध्ये मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता, पण नागपूरला पोहोचण्यासाठी त्याला 23 दिवस लागले. येथे मान्सूनचे आगमन 22 जून रोजी झाले होते. त्याचप्रमाणे 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचला आणि 23 जून रोजी नागपुरात मान्सूनच्या ढगांनी पाऊस पाडला. ढगांना येथे पोहोचण्यासाठी 15 दिवस लागले. 2022 मध्ये, मान्सून 16 जून रोजी आला होता, 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता.