पुणे रेल्वे विभागात दरवर्षी 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती; सुमारे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत (Photo Credit- X)
पुणे : पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढवण्याच्या उद्देशाने पुणे रेल्वे विभागाने सौरऊर्जा प्रकल्पांचा व्यापक वापर सुरू केला आहे. विभागातील प्रमुख रेल्वे इमारती व पायाभूत सुविधांवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांमधून दरवर्षी सुमारे 16 लाखांहून अधिक युनिट वीजनिर्मिती होत असून, त्यामुळे रेल्वेला अंदाजे 1 कोटी 66 लाख रुपयांची बचत होत आहे.
पुणे रेल्वे विभागातील रेल्वेस्थानके आणि कोचिंग डेपोच्या इमारतींवर सौरपॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. या प्रकल्पांमधून दर महिन्याला साधारण पावणेदोन लाख युनिट वीज तयार होत असून, रेल्वे प्रशासनाच्या वीज खर्चात मोठी बचत होत आहे. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागत आहे. पुणे रेल्वे विभागाने २०१६ मध्ये पुणे रेल्वेस्थानकाच्या इमारतीवर १६० किलोवॉट क्षमतेचा सोलर पीव्ही रूफटॉप पॉवर प्लांट बसवून सौरऊर्जेचा वापर सुरू केला.
त्यानंतर विभागाने पुणे, दौंड, सातारा, कोल्हापूर, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, डिझेल लोकोशेड, डीआरएम कार्यालय इमारत आणि इतर महत्त्वाच्या रेल्वेच्या ४२ ठिकाणी २.७४ मेगावॉट क्षमतेचे सोलर रूफटॉप पॉवर प्लांट बसवले आहेत. या प्रकल्पांमुळे रेल्वेच्या कामकाजासाठी लागणारी वीज स्थानिक पातळीवरच निर्माण होत असल्याने ऊर्जा वापर अधिक कार्यक्षम झाला आहे. तसेच पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत असून, कार्बन उत्सर्जनातही घट झाली आहे.
अनेक सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले
पुणे रेल्वे विभागात आतापर्यंत २ हजार ९१९ किलोवॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून, भविष्यात रेल्वेच्या विस्तृत पायाभूत सुविधांचा उपयोग करून सौरऊर्जेचा वापर आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.
रत्नागिरी परिमंडळात थकबाकीदारांचा आकडा मोठा
दुसरीकडे, विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.






