(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रक्ताच्या नात्यांइतकीच मनाने जुळलेली नातीही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची ठरतात. अशाच भावनिक आणि जिद्दीच्या धाग्यावर आधारित नवी मराठी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा नुकताच प्रदर्शित झालेला प्रभावी प्रोमो प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून, नात्यांची ताकद, कुटुंबातील संघर्ष आणि एका ठाम मुलीची लढाऊ वृत्ती याची झलक त्यात पाहायला मिळते आहे.
या कथेत छवी ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. रक्ताचं नातं नसतानाही बाई-आजींसाठी तिच्या मनात अपार आदर आणि प्रेम आहे. राजगुरू परिवाराशी जोडलेलं हे नातं तिच्यासाठी सर्वस्व बनतं. या कुटुंबाच्या रक्षणासाठी छवी कोणतीही लढाई लढायला तयार असते. मात्र तिच्या या प्रवासात अनेक अडथळे, संकटं आणि आव्हानं उभी राहणार आहेत. या सर्व संकटांना सामोरं जात छवी राजगुरू कुटुंबाचं रक्षण कसं करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
गुरुंच्या भेटीने भावूक झाले कलाकार; स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण
या मालिकेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर साकारणारी ‘बाई-आजी’ ही प्रभावी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. त्या पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनही त्यांची ठाम स्क्रीन प्रेझेन्स, करारा स्वभाव आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात घर करेल हे नक्की. छवीची भूमिका अभिनेत्री जान्हवी तांबट साकारत असून, तिचा सोज्वळ आणि निरागस स्वभाव कथेला वेगळी उब देणारा ठरणार आहे.
राजगुरू कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या बाई-आजी या घराचा खंबीर कणा आहेत. एका अपघातात मुलगा आणि सून गमावल्यानंतर त्यांनी आपल्या नातवंडांना आईसारखी माया दिली आणि घर एकत्र ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. याच कुटुंबात लहानाची मोठी झालेली छवी स्वभावाने बडबडी, उत्साही आणि मनाने प्रचंड संवेदनशील आहे. प्रत्येक नातं जपण्याची तिची धडपड आणि बाई-आजींवर असलेली तिची निष्ठा या कथेला भावनिक गाठ देतात.
मात्र या कुटुंबावर संकटाचं सावट आहे ते म्हणजे शांभवीचं. अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि सूडाने पेटलेली शांभवी राजगुरू परिवाराला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखताना दिसते. तिच्या भूतकाळात दडलेलं रहस्य आणि सूडाची भावना या कथेत मोठा संघर्ष निर्माण करणार आहे. छवीला शांभवीचा डाव समजेल का? आणि राजगुरू कुटुंबाचं रक्षण करताना छवीला कोणती किंमत मोजावी लागेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
मालिकेत शांभवीची भूमिका अमृता फडके, वत्सला – वंदना वाकनीस, अनिकेत – संचीत चौधरी, साकेत – अमित रेखी आणि बेबी आत्या – दिशा दानडे साकारत आहेत. या सर्व कलाकारांच्या व्यक्तिरेखा कथानकाला अधिक रंगतदार बनवणार आहेत. या मालिकेविषयी बोलताना भारती आचरेकर यांनी सांगितलं की ‘बाई-आजी’ ही केवळ पारंपरिक आजी नसून मोकळ्या विचारांची, बदल स्वीकारणारी आणि नातवंडांशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी स्त्री आहे. संकटांनी तावूनसुलाखून निघालेली पण घराचा कणा असलेली ही व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खास असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
कलर्स मराठीच्या मराठी क्लस्टरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सतीश राजवाडे यांनीही या मालिकेबद्दल बोलताना सांगितलं की, ही कथा जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि कुटुंबातील मूल्यांची सांगड घालणारी आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी ही मालिका सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नात्यांमधील ताणतणाव, कुटुंबातील संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा खंबीर आवाज यांची झलक देणारी ही कथा प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह विचार करायला भाग पाडते.






