संग्रहित फोटो
पुणे : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी भागात सिमा शुक्लक विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीसाठी बाळगलेले तब्बल १ कोटी ७९ लाखाहून अधिक रकमेचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. सणसवाडी येथील फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिली ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करत राजस्थानच्या ड्रग तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई (वय २६, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी तक्रार दिली आहे. आरोपी मुळचा राजस्थान येथील असून, सध्या तो सणसवाडीतील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होता आणि तेथूनच मेफेड्रॉनची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अंमली पदार्थांची विक्री करणारा एक तरुण सणसवाडीत राहत असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. माहितीची पडताळणी केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पंचांसमवेत बुधवारी रात्री उशिरा संबंधित सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकला. तपासणी केल्यानंतर ती पावडर मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे एकूण वजन ८९८ ग्रॅम ९४ मिली ग्रॅम असल्याचे आढळले. याशिवाय त्या बॅगेतून लहान प्लास्टिक पिशव्या, दोन छोटे चमचे तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटाही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन लहान-लहान प्रमाणात पॅक करून ग्राहकांना विक्रीसाठी देत असल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दोन वर्षापूर्वी कुरकुंभ येथील ड्रग कारखान्यावरील कारवाईनंतर पहिल्यांदाच पुणे ग्रामीण औद्योगिक पट्ट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पथक फ्लॅटवर पोहोचल्यानंतर त्यांनी दार ठोठावले. तेव्हा एक तरुण बाहेर आला. त्याची ओळख पटवून अधिकाऱ्यांनी त्याला शोधाबाबत परवानगी दाखवली आणि फ्लॅटची तपासणी सुरू केली. ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या फ्लॅटमध्ये एक हॉल, एक बेडरूम, स्वयंपाकघर आणि गॅलरी होती. फ्लॅटमध्ये फारसे फर्निचर नव्हते. तपासणीत बेडरूममध्ये ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकाऱ्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात ऑफ व्हाईट रंगाची पावडर असलेल्या सहा प्लास्टिक पिशव्या सापडल्या. त्याची तपासणी केली असता ते एमडी असल्याचे दिसून आले.
पोलिस कोठडीत रवानगी
याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. त्याला कस्टम विभागाने विशेष न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी आरोपीने मेफेड्रॉनचा साठा कुठून आणला, तसेच तो कोणाला पुरवठा करत होता याचा तपास करण्यासाठी व अंमली पदार्थांच्या व्यवहारामागील इतर साथीदारांचा शोध घेऊन जाळे उघड करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जी. जोशी यांनी 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कस्टम विभागातील अमंली पदार्थ विरोधी पथक करत आहे.






