मुंबई : लोकसभा निवडणूकीचे राज्यामधील संपूर्ण मतदान संपले आहे. प्रचारावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे जोरदार राजकीय युद्ध झालेले दिसून आले. निवडणूकीनंतर आता शिंदे गटातील अंतर्गत कलह समोर आला आहे. गजानन किर्तीकर आणि शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांच्यामधील खदखद बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये सामील झालेले गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
गजानन किर्तीकर यांच्याविरोधामध्ये शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिशिर शिंदे यांनी शिंदे गट प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये पाचव्या टप्यातील मुंबईच्या मतदानाच्या दिवशीच शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य केली आहेत. विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची विनंती केली. पक्ष विरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून त्वरीत हकालपट्टी करावी व त्यांना निरोपाचा नारळ दावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
काय लिहिले आहे पत्रात?
त्याचबरोबर शिशिर शिंदे यांनी पत्राच्या माध्यमांतून अनेक आरोप गजानन किर्तीकरांवर केले आहेत. गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी, विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली. खासदार किर्तीकर मातोश्रीचे “लाचार श्री” झाले आहेत. गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. अशा शब्दांत शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन किर्तीकरांवर कारवाईची मागणी केली आहे.