राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई: राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तर राज्याच्या राजकारणात सध्या दुसरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधु एकत्र येणार की नाही? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. दोन्ही पक्ष 5 जुलै राजी मराठी भाषेसाठी एकत्र येणार आहेत. दरम्यान या सर्व विषयावर खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नारायण राणे म्हणाले, “ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला आधार दिला. शिवसेनेने मराठी माणसांच्या नावावर स्वतःचा उदरनिर्वाह केला. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी काय केले? यांना मुख्यमंत्रीपदाचे त्यांना काही महत्व नव्हते. अडीच वर्षांमध्ये केवळ दोन दिवस मंत्रालयात आले. मराठी माणसांसाठी , तरुणांसाठी, त्यांच्या नोकरीसाठी, पोटापाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले? मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही.”
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, “राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार अशा चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवयाचा की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शेवटी काय करायचे आणि काय नाही हा त्यांचा व्यक्तिगत मुद्दा आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेत यावे असे ते कधीच म्हणणार नाहीत. कारण असे झाले तर त्यांचे अस्तित्वच राहणार नाही. राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तर ते प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य राहणार.”
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं
राज्याचे राजकारण सध्या ठाकरे बंधूच्या भोवती फिरत आहे. मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महायुती सरकारने याबाबत आदेश रद्द केले असले तरी देखील दोन्ही नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. सर्व मराठी माणसांना सहभागी होण्याचे आवाहन देखील ठाकरे बंधूंनी केले आहे. एकीकडे सर्वांचे लक्ष विजयी सभेकडे लागलेले असताना भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेमध्ये असल्यामुळे त्यांनी राज ठाकरेंना दिलेल्या त्रासाचा देखील उल्लेख केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं…पक्षाबाहेर पडायला प्रवृत्त केलं…; माजी शिवसैनिकांचा गंभीर दावा
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांचा रोष व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी लिहिले आहे की, “उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.