बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे माहेर असेलल्या काटेवाडी गावामध्ये नवरात्र उत्सवात महिलांसोबत दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, दिवसभर त्यांनी बारामती तालुक्यातील कटफळ, गाडीखेल, साबळेवाडी, शिर्सूफळ, पारवडी, सिद्धेश्वर निंबोडी, जैनकवाडी वंजारवाडी, सावळ, तसेच कन्हेरी या गावांना भेटी देऊन विविध विकास कामांची माहिती घेत ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. काटेवाडी येथील नवरात्र उत्सव मंडळातील दुर्गा मातेची आरती खासदार सुळे यांच्या हस्ते घेण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दांडिया नृत्यामध्ये महिला व युवतींसोबत त्यांनी उत्स्फूर्तपणे दांडिया नृत्याचा आनंद लुटला. गेल्या अनेक दिवसानंतर माहेरच्या महिलांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी दांडिया नृत्य केल्याने उपस्थित महिला व युवतींचा उत्साह दुणावला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या दांडिया नृत्याला दाद दिली.
[read_also content=”मुंबईत शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात, 15 ते 20 गाड्यांचे मोठे नुकसान https://www.navarashtra.com/maharashtra/accident-in-shinde-group-leader-arjun-khotkar-in-aurangabad-332761.html”]
दरम्यान, गेली दहा दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या तीन दिवसांच्या दौऱ्याची चर्चा महाराष्ट्रसह देशभर सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या या रणनीतीला आव्हान देत खा. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये झंझावती दौरा सुरू करून जनतेशी थेट संपर्क अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातील ११ गावांमध्ये सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटी दिल्या.