मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)
Mumbai Goa Highway Accident News Marathi: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढतच चालले असून माणगाव तालुक्यातील लाखपाले येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले वैद्यकीय अधिकारी गंभीर जखमी झाले.
मृत महिला डॉक्टरांची ओळख डॉ. प्रियंका भास्कर आहेर (वय 32, मूळ रा. बीड, सध्या रा. पुणे) अशी असून, जखमी डॉक्टरांचे नाव डॉ. विशाल रमेश बडे (वय 30, रा. अनपटवाडी पारगाव, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. पुणे) आहे.
12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कंटेनर चालक राहुल रामचंद्र यादव (वय 24) हा महाडहून मुंबईकडे जात होता. चढावाच्या रस्त्यावर कंटेनर एका लेनवरून दुसऱ्या लेनवर वाकडी-तिकडी चालवत असताना, लाखपाले येथील निर्मल एच. पी. पेट्रोलपंपासमोर कंटेनर आणि डॉक्टरांच्या कारची जोरदार धडक झाली.
धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग थेट कंटेनरच्या मागील चॅसिसखाली अडकला. यात डॉ. आहेर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. डॉ. बडे यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळाची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर हे करत आहेत. या वेळी ट्रॅफिकचे दळवी व इतर ट्रॅफिक पोलीस उपस्थित होते.
महामार्गावरील वाहतुकीस अडथळा येऊ नये याचीही दक्षता : “टेमपाले गाव हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनर आणि वॅगनआर कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा येऊ नये याचीही दक्षता घेण्यात आली. घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील परिस्थिती हे अपघाताचे कारण असल्याचा अंदाज आहे,” असंही गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी सांगितल आहे.