मुंबईत सर्वात मोठी 'डिजिटल अरेस्ट'ची घटना; ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक
डिजिटल अरेस्ट स्कॅमद्वारे सायबर चोरट्यांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान मुंबईत डिजिटल अरेस्टचं एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ८६ वर्षीय महिलेची तब्बल २० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित वृद्ध महिलेला फोन केला होता. आधार कार्डचा अवैध कामासाठी वापर झाल्याचे सांगून पीडितेच्या खात्यामधील पैसे विविध बँक खात्यात वळवण्यात आले आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे.
२६ डिसेंबर २०२४ ते ३ मार्च २०२५ या काळात सदर घोटाळा झाला असून या काळात आरोपींनी एकूण २०.२५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर पोलीस शाखेने दोन जणांना अटक केली आहे, एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शायन जमील शेख (२०) आणि राजीक आझम बट (२०) या दोन आरोपींना अटक केली आहे. ते अनुक्रमे मालाड (पश्चिम) आणि मीरा रोड (पूर्व) येथे राहतात. यापैकी बट हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याने टेलिग्रामवर १३ विदेशी नागरिकांचा एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर भारतीय बँक खात्यांची माहिती पुरविली गेली होती. घोटाळ्याशी संबंधित ही खाती असल्याचे लक्षात आले आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, डिसेबंर २०२४ मध्ये आरोपींनी पीडित महिलेला पहिल्यांदा फोन केला होता. त्यात त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडितेच्या आधार ओळखपत्राचा मनी लाँडरिंगसाठी वापर झाल्याचे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेच्या आधार कार्ड आणि वैयक्तिक माहितीचा वापर करून इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले असल्याचे आरोपींनी सांगितले. या खात्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग केले गेले, असेही आरोपी म्हणाले.
मनी लाँडरिंग गुन्हा घडल्याचे सांगून आरोपींनी पीडित महिलेला भीती दाखवली. तसेच पीडिता आणि पीडितेच्या कुटुंबांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पीडितेने तिच्या खात्यातील पैसे वळते करावेत, यासाठी आरोपींनी डिजिटल अरेस्ट सारखे तंत्र वापरले. डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान पीडित महिलेने २०.२५ कोटी रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यामध्ये वळवले आहेत.