एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण
मुंबई : राज्यातील जनतेसाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यात लाडकी बहीण योजना आणि एसटीची सवलत योजना चांगलीच पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून निधी घेतल्याचे समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. असे असताना आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील सवलतींचा लाभ घेणाऱ्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आता परिवहन विभागाची एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत उपसचिव, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महामंडळाची आर्थिक स्थिती, वाढती देणी, कर्ज, उत्पन्नाचे स्रोत, पुढील पाच वर्षांचे आर्थिक नियोजन आणि कर्मचारी स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्पांचे पुनर्मूल्यांकन, महामंडळाच्या मालमत्तेचा व्यावसायिक वापर आणि महसूलवाढीसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
एसटी महामंडळाच्या या बैठकीत एसटी महामंडळ शासनाकडे दरमहा सुमारे 450 कोटी रुपयांच्या सवलत मूल्याची मागणी करत असले, तरी त्या दाव्यांच्या गणनेत गंभीर त्रुटी असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. विविध प्रवर्गांना दिलेल्या तिकीट सवलतींची प्रतिपूर्ती कोणत्या निकषांवर निश्चित केली जाते, याबाबत समाधानकारक माहिती महामंडळाकडून सादर केली नसल्याने शासनाकडे पाठविल्या जाणाऱ्या मागण्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
सवलत मूल्य आता तपासले जाणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील सवलतींचा अनेक नागरिक लाभ घेत आहेत. या प्रवाशांच्या तिकीट सवलत प्रतिपूर्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विविध प्रवर्गातील लाभार्थी प्रवाशांची माहिती तपासून सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या दाव्यांची अचूकता पडताळण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. सध्या एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, वित्तीय शिस्त, लेखापरीक्षण आणि महसूलवाढीच्या उपाययोजनांवर सरकारने भर दिला आहे.






