सायप्रसच्या राष्ट्र्पतींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारत आणि सायप्रस यांचे संबंध लोकशाही, सार्वभौमत्व आणि शांततामय सहअस्तित्व या समान मूल्यांवर आधारित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये केलेल्या सायप्रस दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ मिळाले असून आर्थिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.”
“महाराष्ट्र हे आज $660 अब्ज अर्थव्यवस्थेचे राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. मुंबई हे जगातील वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र बनत असून राज्यात अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो नेटवर्क, लॉजिस्टिक पार्क आणि स्मार्ट शहरांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतांमधून निर्माण होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय एज्यु सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटीसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्पही उभारले जात आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, “सायप्रस हे युरोप, पूर्व भूमध्य समुद्र आणि मध्यपूर्वेसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. सागरी वाहतूक, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा आणि नवोपक्रम क्षेत्रात सायप्रसची मोठी ताकद असून महाराष्ट्र आणि भारत हे जागतिक आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरेल. फिनटेक आणि डिजिटल व्यवहार क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला असून भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे अब्जावधी व्यवहार सुरक्षितपणे होत आहेत. सायप्रसच्या युरोपीय वित्तीय नेटवर्क आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे सीमापार वित्तीय व्यवहार आणि डिजिटल नवोपक्रमासाठी नवे मार्ग खुले होतील.”
शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?
“कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, संशोधन, शिक्षण आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात येणारे जागतिक गुंतवणूकदार हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यात गुंतवणूक करत आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील संबंध आशादायी असून भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागर हे व्यापार, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्याद्वारे अधिक जवळ येत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (CCCI)चे अध्यक्ष स्टावरोस स्टावरू, इन्व्हेस्ट सायप्रसचे अध्यक्ष एव्हजेनिओस एव्हजेनिओ, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा द सन्मार ग्रुपचे अध्यक्ष विजय शंकर, सीआयआयच्या राष्ट्रीय कौशल्य आणि उपजीविका समितीचे अध्यक्ष तथा ब्ल्यू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.






