मुंबईतील घरांबाबत एकनाथ शिंदे यांची घोषणा (फोटो- सोशल मिडिया/istockphoto)
मुंबई: ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतीमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल त्याचबरोबर मुंबईची विशिष्ट ओळख निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरात देखील ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे एक जागतीक दर्जाचे शहर असून आपल्या देशाला वास्तुकलेचा फार मोठा वारसा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई शहरात अशा वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये व पर्यटन क्षमता वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल व त्यामुळे मुंबई शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल.
विशिष्ट प्रकारच्या इमारतींकरीता मुंबईसाठी सध्या लागू असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींमुळे मर्यादा येत असल्याने अशा वैशिष्टपूर्ण इमारती उभारणे शक्य व्हावे व वास्तुकलेस चालना मिळावी याकरीता आयकॉनिक इमारती करीता नवीन धोरण शासनाने तयार केले आहे. आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी मुंबईच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतुद समाविष्ट करण्यासाठी नियमावलीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सदर नियमावलीमध्ये फेरबदल करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Eknath Shinde : “अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”, एकनाथ शिंदे यांची मागणी
राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. पाच नगर रचनांमध्ये पंढरपूर, औंढा नागनाथ व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. विकास योजनांना शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता या शहरांचा जलद गतीने नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
विक्रमगड, पोलादपूर ,जव्हार, तलासरी, मोखाडा, नांदुरा, तळा, कळंब, भूम, अक्कलकोट, औंढा नागनाथ, कन्नड, बोदवड, सेनगाव, कळमनूरी, हदगाव, शेंदुर्णी राजगुरुनगर, पाचगणी, बुलढाणा, वाडा, मानोरा, भूम, अंमळनेर, मोर्शी, छत्रपती संभाजीनगर, उरळी देवाची, उमरेड, बार्शीटाकळी, किनवट, किल्ले धारूर, वसमतनगर, चंदगड, मैंदर्गी, फुलंब्री, होळकरवाडी, महाबळेश्वर, मोहोळ औताडे-हांडेवाडी, फुरसुंगी, येवलेवाडी, पूर्णा, मूर्तीजापुर, जळगाव, तिवसा, नायगाव, नेरळ, चांदवड, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, पंढरपूर, बदनापूर, निफाड, सांगली मिरज कुपवाड या विकास योजनांचा समावेश आहे.