"मला शिव्या खाण्याची आणि उपहास सहन...", जरांगेंच्या मागण्या आणि फडणवीसांचे प्रत्युत्तर (फोटो सौजन्य-X)
Devendra Fadnavis on Manoj Jarange’s News In Marathi: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तपाले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरु केला. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहेत.”कितीही शिव्या दिल्या, उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही,” असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मला शिव्या खाण्याची आणि उपहास सहन करण्याची सवय आहे. लोक कर्तृत्वामुळे इतिहासात लक्षात राहतात, शिव्या देणाऱ्यांना कोणी लक्षात ठेवत नाही.” फडणवीसांनी पुढे सांगितले की, जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. मात्र, कोणताही निर्णय हा कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या मर्यादेतच घेतला जाईल. “जे समाजाच्या हिताचे आहे, तेच आम्ही करू. पण सरसकट ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याची मागणी सामाजिक ऐक्य बिघडवू शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे. जर आंदोलन लोकशाही पद्धतीने केले गेले तर आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने लोकशाही चळवळीला सामोरे जाऊ आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही मराठा समाजाला आधीच १० टक्के आरक्षण दिले आहे, त्यामुळे हे आंदोलन का केले जात आहे हे समजत नाही.
ओबीसी वर्गात आधीच ३५० जातींचा समावेश असताना, आंदोलक ओबीसी कोट्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. वैद्यकीय प्रवेशात ओबीसीचा कट ऑफ एसीबीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) पेक्षा जास्त आहे आणि एसीबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. अशा परिस्थितीत, ही मागणी मराठा समाजासाठी किती फायदेशीर ठरेल हे स्पष्ट नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्यासाठी हे राजकीय आंदोलन नाही. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेऊ इच्छितात, परंतु शेवटी त्यांना फायदा होणार नाही तर फक्त नुकसानच होईल.