'मराठी भाषा संवर्धनाची...', बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली जाईल. सुरुवातीला मुंबईत आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात हे अभियान राबवू, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना झीरो प्रिस्क्रिप्शन आणि कॅशलेस सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या माध्यमातून राज्यात ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार आहे. या गडकोटांवर आरओ फिल्टर बसवले जातील, तसेच प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले अशी मोहीम हाती घेतली जाणार आहे. युनेस्कोने समावेश केलेल्या जागतिक वारसा यादीतील ११ किल्ल्यापासून ही मोहीम सुरु होईल. यात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना आणि संस्थांना १ लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य, शिक्षण याबरोबरच ज्येष्ठांसाठी एसटी संगे तिर्थाटन योजना, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी, मराठी भाषा संवर्धनासाठी १०० कोटी, रस्ता सुरक्षा मोहीमेसाठी १०० कोटीची तरतूद केली आहे. तसेच १० हजार विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे, शालेय शिक्षण विभागाकडून निबंध, वक्तृत्व, चित्रकला, व्यंगचित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाईल. झोपडपट्टीमुक्त मुंबईचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए सारख्या संस्थांच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे. ४० लाख मुंबईकरांना हक्काचे घर देणार आहोत, असे ते म्हणाले.
राज्यातील २९ महापालिका आणि ३९४ नगर परिषदांमध्ये ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवले जाणार आहे. यासाठी नगर परिषदांना १ कोटी आणि महापालिकांना ३ कोटींचा निधी दिला जाईल, यासाठी नगर विकास खात्याकडून ५३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नगर पालिका आणि महापालिका शाळांमधून सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळांना गौरवण्यात येणार आहे. महापालिका शाळांसाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख आणि ५ लाख तर नगर परिषदेच्या शाळांसाठी अनुक्रमे ५ लाख, ३ लाख आणि २ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. राज्यातील ६ विभागांमधील १८ शाळांना या अभियानातून सन्मानित केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. शाळांचा दर्जा वाढवणे, सोयी सुविधांचा विकास आणि शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गावागावात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी योजना सुरु केली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शिवसेनाप्रमुखांनी देशभर हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार फुंकला. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हे म्हणण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांनी दाखवले. त्यांचे विचार घेऊनच शिवसेना पुढे जातेय, असे ते म्हणाले. शिवसेना चांदा ते बांदा घराघरात पोहोचली आहे. विधानसभा निवडणूक, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यातील दुसरा मोठा पक्ष ठरला. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एक कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांच्या आशिर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री बनवण्याची संधी आपल्याला मिळाली, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘एनडीए’मध्ये शिवसेनेला मानसन्मान मिळतोय. अयोध्येत राम मंदीर निर्माण आणि काश्मिरमध्ये ३७० कलम हटवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला आणि बाळासाहेबांसह कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले.






