Photo Credit- Social Media
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज (15 ऑक्टोबर) घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद होणार असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी येत्या महिनाभरात निवडणुका होणार आहेत. येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्यापुर्वीच निवडणुका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकां वाढल्या आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी नेमलेल्या निरीक्षकांसोबतही बैठका होणार आहेत. तर ठाकरे गट आणि शरद पवार यांचीही तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, येत्या १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत मतदान होऊ शकते. तर 20 ते 25 नोव्हेंबर या काळात मतमोजणी केली जाईल, 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्याआधीच नवे सरकार सत्तेत येईल. असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.
हेही वाचा: “मी शपथ घेतो की…”, राज्यपालनियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांनी घेतली शपथ
2019 साली राज्यात शिवसेना-भाजपची युती होती. राज्यात शिवसेना- भाजप विरूद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण 61.04 टक्के असे मतदानझाले होते. या निवडणुकीत भाजपला 105 जागा तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहूमत होते. पण मुख्यमंत्रीपदावरून झालेल्य मतभेदांमुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि राजकीय संकट निर्माण झाले. त्यामुळे कोणत्याही पक्षाला सत्तास्थापनेसाठी दावा करता येत नव्हता. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहूमत चाचणीपूर्वीच 26 नोव्हेंबरला दोघांनीही आपापल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 28 नोव्हेंबरला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चालले.
हेही वाचा: फूड अॅलर्जी विरूद्ध फूड इनटॉलरन्स, काय आहे नेमका फरक?
पण 2022 साली शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्यावर्षी अजित पवार हेदेखील आपल्या समर्थक आमदारांसह महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. आता राज्यात एकनाथ शिंदे मु्ख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत.






