ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिकेला मिळणार चालना! मेट्रो मार्ग 5 ला वेग, 27 हेक्टरमध्ये उभा राहतोय अत्याधुनिक कशेळी डेपो
एमएमआरडीएने डेपोचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण डेपो तयार होण्याची वाट न पाहता मेट्रोच्या चाचण्या, तपासणी, देखभाल आणि प्राथमिक परिचालन सुरू करता येणार आहे. यामुळे मेट्रो मार्ग 5 लवकर सुरू करण्यास मोठी मदत होणार आहे.
कशेळी डेपोमध्ये सुमारे 30 मेट्रो रेक्स ठेवण्याची क्षमता असेल. तसेच पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी ट्रॅक, शंटिंग सुविधा, डेपो नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवास, रिसिव्हिंग सबस्टेशन, गाड्यांची धुलाई केंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या जागेवर सहा ते नऊ मीटर खोलीपर्यंत मऊ सागरी चिकणमाती असल्याने जमिनीची स्थिरता वाढवण्यासाठी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत भू-सुधारणा तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. प्रीफॅब्रिकेटेड व्हर्टिकल ड्रेन्स (PVD) आणि अतिरिक्त भरावाच्या माध्यमातून जमिनीची भारवहन क्षमता वाढवली जात आहे.
डेपो नियंत्रण केंद्राच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू.
कर्मचारी निवासस्थानांच्या पायाभरणीचे काम सुरू.
महापालिकेच्या 2400 मिमी व 2750 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण.
तात्पुरत्या तपासणी पिट शेड, चाचणी ट्रॅक, ऑक्झिलरी सबस्टेशन आणि शंटिंग नेकची उभारणी सुरू.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कशेळी डेपो आधुनिक आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा असून मेट्रो मार्ग 5 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील संपर्क अधिक सक्षम होईल.
एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कशेळी डेपो मेट्रो मार्ग 5 च्या सुरक्षित आणि कार्यक्षम परिचालनाचा कणा ठरणार असून या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होईल.
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, वैज्ञानिक अभियांत्रिकी, काटेकोर नियोजन आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे जात असून भविष्यातील विश्वासार्ह मेट्रो सेवेसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
मेट्रो ९ मार्गावर ७ नवीन पादचारी पूल उभारणार; मीरा-भाईंदरकरांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ






