मंत्री मंगलप्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
केईएममध्ये नोंदीसाठी दहा नवी केंद्र
औषधांचा तुटवडा भरून काढणार
खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढणार
मुंबई: मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा करून तिथल्या प्रशासनाला गैरसोयीबाबत धारेवर धरल्या नंतर आता तिथे व्यवस्थेत बदल करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. येत्या १५ दिवसात केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळ ही वाचणार आहे. के.ई.एम. रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अपुऱ्या सुविधा, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांची आज पालिका मुख्यालयात संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात रुग्ण सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.
केईएममध्ये होत असलेली नागरिकांची गैरसोय, आणि खाजगी चाचण्यांमुळे रुग्णांची लूट पाहून मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी तीव्र संताप व्यक्त करत डीन डॉ.संगीता रावत यांना जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रुग्णांच्या अनेक तक्रारींचा विचार करण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, भाजप दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती शलाका साळवी आणि पदाधिकारी सतीश तिवारी उपस्थित होते.
दोन वर्ष पुरेल एवढा औषधांचा साठा
या बैठकीत औषधांच्या टंचाई बाबतही चर्चा करण्यात आली. यावर मंत्री लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष साटम यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले. या चर्चेदरम्यान पुढील दोन वर्ष आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्टॉक करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार
अनेक नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून के.ई.एम एमआरआय मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती. तब्बल सहा सहा महिने एमआरआयसाठी तारीख मिळत नसल्याचेही रुग्णांनी सांगितले होते. यावर मार्ग काढण्यासाठी जोंपर्यंत केईएम मधील एमआरआय मशीन दुरुस्त होऊन व्यवस्था सुरळीत होत नाही, तो पर्यंत खाजगी केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांकडून महापालिकेच्या दरानुसारच एमआरआय चाचणीची आकारणी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्यानुसार पुढच्या सात दिवसात खाजगी एमआरआय केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी के.ई.एम. रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री.अमितजी साटम यांच्या… pic.twitter.com/J38uo1kgUE — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 12, 2025
रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी दक्षता समिती
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात कूपर रुग्णालयात पूर्ण वेळ अधिष्ठाता नसल्याने तिथे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दाही या बैठकीत चर्चिला गेला. त्यावर माहिती देताना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले की, लवकरच रिक्त पदे भरली जाणार असून तिथे पूर्ण वेळ अधिष्ठाता नेमण्यात येणार आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा बारकाईने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यांना आवश्यक शासकीय साह्य ही देण्यात येईल. तसेच यापुढे तक्रारी येत असलेल्या पालिकेच्या अन्य रुग्णालयात ही पाहणी दौरा आयोजित केला जाईल. गेल्या २५ वर्षात महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यानी जी दलाली आणि कुचकामी व्यवस्था उभारली आहे, ती व्यवस्था आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच मोडीत काढली जाईल,असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.






