मुंबईकरांची होणार कोंडी! CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय
Manoj Jarange Patil Mumbai Morcha News in Marathi :मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो आंदोलक आता मुंबईकडे रवाना होत आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सीएसएमटी स्टेशनकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आझाद मैदानाबाहेरील महत्त्वाचे मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत हे आंदोलन महत्त्वाचे मानले जाते. आंदोलकांची वाढती संख्या आणि वाहतुकीतील बदलांमुळे मुंबईकरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.