Photo Credit- Social Media
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास बैठक झाली. या बैठकीबाबत मुंडे यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढत असतानाच ही बैठकी झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.
हेदेखील वाचा : Beed Political News : करुणा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार; नेमकं कारण काय?
धनंजय मुंडे गुरूवारी रात्री आठच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित झाले. या नेत्यांमध्ये सुमारे दीड तास बैठक झाली. या बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने माध्यमांना माहिती देताना, बैठकीत शासकीय कामकाज आणि पक्षीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले; परंतु बैठकील प्रफुल्ल पटेल हजर असताना शासकीय चर्चा कोणती?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्र्यांचे अभय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुणा शर्मा यांना भेटीसाठी वेळ न दिल्यामुळे त्या चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. करुणा यांनी अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे, असे गंभीर आरोप केले. त्या पुढे म्हणाल्या, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते मुंडेंची पाठराखण करत आहे. या घटनेला दोन महिने लोटूनही अद्याप आरोपी कृष्णा आंधळेला अटक झालेली नाही. मात्र, एका माजी मंत्र्याचा मुलगा गायब होताच त्याचा पोलिस यंत्रणा तीन तासात शोध घेते. परंतु, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. याप्रकरणात सगळे पुरावे असूनही ते मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अजितदादांनी टाळली सुरेश धस यांची भेट
बीड जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांची भेट अजित पवारांनी टाळली. त्यामुळे धस थेट बीडला रवाना झाले. बीड जिल्हा नियोजन समितीमधील विविध कामात भ्रष्टाचाराचे पेव फुटल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून धस हे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार कसा झाला आहे याची माहिती देणार होते. मात्र, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांना भेटीची वेळ दिली नाही.
हेदेखील वाचा : Kokan Politics : राजन साळवींच्या प्रवेशाने कोकणात नाराजी; शिंदे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत