खेळाचे मैदान विकसित करण्याची मंत्री लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोस्टल रोडमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, त्या जागेपैकी ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
मोकळ्या जागेच्या योग्य उपयोगासाठी आणि युवकांना खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फुटबॉलचे मैदान, क्रिकेटचे मैदान, रनिंग ट्रॅक तसेच कबड्डी सारख्या पारंपरिक खेळांसाठी मैदान उभारण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, उर्वरित १५० एकर जागेवर भव्य उद्यान आणि वृक्षारोपण करण्यात यावे, यावरही त्यांनी भर दिला आहे.
पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत भविष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध होईल की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या संधीचा उपयोग करून विविध खेळाची मैदाने निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यास युवा पिढीला खेळासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि मुंबईकरांसाठी देखील एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जाईल. या प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन आवश्यक सरकारी परवानग्या व प्रक्रियांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढांना 36 वर्षांनी दिलासा
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुरु असलेल्या ३६ वर्षे जुन्या खुटल्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान ग्रांट रोड रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनासाठी त्यांच्याविरोधात खटला सुरु होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
१९८९ सालच्या रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भाजपाचे सध्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे तात्कालीन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. या आंदोलना दरम्यान लोढा यांच्या नेतृत्वाखाली ग्रांट रोड स्थानकावर रेल रोको आंदोलन झाले होते. तब्बल ३६ वर्षे हा खटला सुरू राहिला. रामजन्मभूमी आंदोलनात हिंदूंच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आणि रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर अनेक भागांत विविध ठिकाणी वेगवेगळे खटले दाखल झाले होते. त्यातील हा एक खटला होता.