आमचे पाणी ऑक्सिजन बाहेरच्यांनी चोरल्याचा गणेश नाईकांचा आरोप (फोटो- सोशल मीडिया)
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणेकरांवर नाव न घेता शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की, नवी मुंबईत आमचे कोणी वैरी नाहीत. तर बाहेर आहेत. नवी मुंबईचा ऑक्सिजन, नवी मुंबईचे पाणी बाहेरच्यांनी चोरले असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी भावे नाट्यगृहात पत्रकारांशी बोलताना केला. आम्हाला त्यांना थांबवायचे आहे. इथले भुखंड त्यांनी विकासकांच्या घशात घातले असा आरोप मंत्री नाईक यांनी केला. नाईक यांचा रोख ठाणेकरांवर असल्याचा रोख लपून राहिलेला नाही. मात्र नाईकांच्या वक्तव्याने शिवसेनेने देखील भाजपाच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मंत्र्यांनी हिमत असल्यास नाव घेऊन बोलावे हवेत बाण मारू नयेत अशी टीका शिवसेनेचे बेलापुर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी नाईक यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल हा येत्या काही महिन्यातच वाजू शकतो. मात्र या निवडणुकीआधी महायुतीमध्ये मोठी धूसपुस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे.अशातच आता गणेश नाईक यांनी केलेली टीका शिंदे सेनेच्या जिव्हारी लागली असून, त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते किशोर पाटकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, की जर वनमंत्री गणेश नाईक यांनी पाणी, ऑक्सिजन चोरल्याचे आरोप केले असल्यास ,त्यांनी नाव घेऊन बोलण्याची हिंमत करावी. हवेत बाण मारू नयेत. नाव घेतल्यास जशास तसे प्रत्युत्तर देऊ. नवी मुंबईत कोणी काय हडप केले हे जनतेला माहीत आहे. जर त्यांचे नेते म्हणत असतील की आम्ही स्वबळावर लढू, आमचा त्यांना पाठिंबा आहे. गणेश नाईक यांची नवी मुंबई सह ठाणे तसेच जिल्ह्यातील इतर पालीकांमध्ये खरोखर ताकद आहे., त्यांनी आता वेगळेच लढावे. सर्वाधिक आनंद आम्हाला होईल असा टोला किशोर पाटकर यांनी गणेश नाईक तसेच स्वबळाचे भाष्य करणाऱ्या माजी खा. संजीव नाईक यांना लगावला.
माजी खा. संजीव नाईक यांचा स्वबळाचा नारा
गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. नवी मुंबईत आम्ही बलाढ्य असून आमची ताकद असल्याने आम्ही स्वबळावर लढण्यासाठी आग्रही आहोत. मात्र अखेर निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. वरिष्ठ जो निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत माजी खा. संजीव नाईक यांनी व्यक्त केले. ते एका कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांशी बोलत होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा नवी मुंबई प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात नवी मुंबई तसेच नवी मुंबईकरांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेतले आहेत असे संजीव नाईक म्हणाले.
खा. नरेश म्हस्केंचा इशारा
एकीकडे भाजपमधून सातत्याने एकला चलो रे चा नारा दिला जात आहे. तर अनेकदा वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील स्वबळाचा उच्चार केलेला आहे. मात्र दुसऱ्याच क्षणी वरिष्ठांच्या आदेशाने युतीचा निर्णय होईल असे देखील गणेश नाईक म्हणत आहेत. नवी मुंबईत भाजपाच्या नेत्यांच्या या भूमिकेने शिंदे गटात देखील स्वबळाचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीसाठी सामंजस्याची भूमिका घेत आहेत. मात्र भाजपाच्या नवी मुंबईतील नेत्यांकडून मात्र सत्याने शाब्दिक हल्ले एकनाथ शिंदेंवर केले जात आहेत. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे खा. नरेश म्हस्के यांनी देखील वारंवार भाजपाला इशारा दिला आहे.. जर भाजपकडून सातत्याने आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही देखील स्वबळावर लढण्यास खंबीर आहोत असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.