ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेसवेा बंद, तर दुसरीकडे ठाणे- बेलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local News in Marathi : मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ठाणे आणि ऐरोली दरम्यानच्या पुलात तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली. मुख्य मार्गावरील लोकल ही उशिराने धावत होत्या. तर दूसरीकडे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको बस थांबा ते दिघा पर्यंत वाहतुक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे रेल्वेसेवा टाळत रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. रेल्वे आणि रस्ते अशा दुहेरी कोंडीत नागरिक अडकले होते.
मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी शुक्रवारची सकाळ वाईट होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पुलात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे रेल्वे सेवा अचानक बंद करण्यात आली. हा पूल ठाणे आणि ऐरोली दरम्यान आहे. तासन्तास वाट पाहिल्यानंतर पाहून ट्रान्स हार्बरवरील लोकलसेवा सुरु करण्यात आली नाही. तर मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर धावणाऱ्या गाड्या ३० मिनिटांपेक्षा जास्त उशिराने धावत होत्या. सकाळी ८ नंतर ट्रान्स-हार्बर लाईन सेवा बंद करण्यात आल्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
सकाळी १० नंतर सेवा पूर्ववत करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा तपासणी आणि संरचनात्मक तज्ञांच्या मंजुरीनंतरच सेवा पुन्हा सुरू करायच्या होत्या, परंतु ते होऊ शकले नाही. ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानच्या मार्गावरील सर्व उपनगरीय सेवा अचानक बंद झाल्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बस आणि कारसह इतर वाहतुकीच्या साधनांचा शोध घ्यावा लागला, असे प्रवाशांनी सांगितले.
प्रवाशांनी सांगितले की, स्टेशनवर अचानक घोषणा झाली की ट्रान्स-हार्बर कॉरिडॉरवरील सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या लोकांना त्रास झाला. हा कॉरिडॉर नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडतो. बरेच लोक त्यांच्या कामावर उशिरा पोहोचले. तर मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ७.१० वाजल्यापासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. ठाणे ते ऐरोली दरम्यान एमएमआडीए विभागाच्या रोरो ब्रीजच काम सुरु असल्याने ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी ठाणे स्टेशनला आणि रेल्वे रुळावर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.