An exhibition of paintings by painter Ramdas Lohi will run until May 12 at the Artist Center in Mumbai
सृजनशील चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे कर्जत तालुक्यातील बीड गावातील चित्रकार रामदास लोभी यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या सुरु आहे. मुंबई मधील आर्टिस्ट सेंटर मध्ये हे प्रदर्शन सुरु असून भावनेचा अथांग सागर असे शीर्षक या चित्र प्रदर्शनाला देण्यात आले असून हे चित्र प्रदर्शन १२ मे पर्यंत चालणार आहे. कर्जत तालुक्यातील बीड या चोहोबाजूंनी निसर्गाने नटलेल्या गावातील चित्रकार रामदास लोभी यांनी मुंबईत आपले शिक्षण पूर्ण केले.
“मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…”, प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा
चित्रकलेची विशेष आवड असलेल्या चित्रकार रामदास लोभी यांनी आतापर्यंत देशात आणि परदेशात देखील आपल्या चित्रांची प्रदर्शने भरविली आहेत. भावना, विचार आणि आत्म्याच्या शांत, गुंतागुंतीच्या प्रवाहाचं चित्रमाध्यमातून केलेलं सर्जनशील दर्शन हे चित्रकार रामदास लोभी यांच्या चित्रातून घडत असते.त्यामुळे यांच्या कुंचल्यातून उभं राहिलेली प्रत्येक रचना किंवा चित्र हे केवळ एक दृश्य न राहता एक अनुभव आणि एक संवाद बनतो अशी त्यांच्या चित्रांची ख्याती आहे. जिथे रंग बोलतात आणि शांतता साक्षात प्रकट होते अशी चित्र रामदास लोभी साकारत असल्याने त्यांच्या चित्र प्रदर्शन यांना कायम रसिकांची पसंती राहिली आहे.
मुंबईतील आर्मी-नेव्ही बिल्डिंग, कालाघोडा येथील आर्टिस्ट्स सेंटर आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरले असून १२ मे पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनातील चित्रांमध्ये ग्रामीण सण, परंपरा, पारंपरिक पोशाख, स्थानिक लोकजीवनाचे तपशीलवार दर्शन घडते. त्याचबरोबर या दृश्यांआडून झिरपणारी गूढ आत्मीयता आणि मानवी भावना प्रेक्षकांशी अतिशय सहजतेने संवाद साधतात. नृत्यात लीन झालेली स्त्री, ढोल वाजवणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणाची आंदोलने तसेच ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती आणि मानवी भावभावनांचा शोध घेणारे चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे “Abyss of Sentience” (भावनेचा अथांग सागर) हे चित्र प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल.