पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पुण्याचा गड राखणारे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हे आता मंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांचा मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये समावेश होणार आहे. आज नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडणार आहे. यावेळी मुरलीधर मोहोळ कोणत्या पदाचा कारभार स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुरलीधर मोहोळ हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे शपथविधी कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. संपूर्ण कुटुंबासह ते महाराष्ट्र सदन येथे आले आहेत. याठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. फडणवीस यांची मोहोळ कुटुंबाने भेट घेतली आहे. यानंतर शपथविधी सोहळ्यामध्ये खासदार मोहोळ यांच्याकडे कोणत्या पदाची धुरा दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट
मा. देवेंद्रजींचा आशीर्वाद…@Dev_Fadnavis @Devendra_Office pic.twitter.com/Dnt8V6DGQu
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) June 9, 2024
महापौर ते केंद्रीय मंत्री
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. पुण्याचे खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना जोरदार लढत देत तब्बल 1 लाखाहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला. पहिल्यांदाच खासदार झालेले मोहोळ हे या पूर्वी पुण्याचे महापौर होते. सन 2002, 2007, 2012 आणि 2017 या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर 2019 ते 2022 या कालावधीत त्यांनी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. कुस्तीचा आखाडा गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.