Photo Credit- Team Navrashtra मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत नाव आल्यावर मुरलीधर मोहोळांचे स्पष्टीकरण
Murlidhar Mohol: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आज आठ दिवस उलटून गेले. पण अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यात कालपर्यंत पुण्यातील भाजपनेते मुरलीधर मोहोळ यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असल्याची चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.
“समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.”
मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल. कारण धक्कातंत्रचा वापर करणे ही भाजपची खासियत आहे. याची जाणीव राजस्थान आणि मध्य प्रदेश पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून सध्या अनेक नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. भाजप नेतृत्वाचा इतिहास पाहता महाराष्ट्र राज्यात देखील नवीन चेहरा जाहीर केला जाणार की, फडणवीस यांनाच संधी मिळणार हे पहावे लागेल. भाजपमध्ये कोणते नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.