मंगळवेढा : पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याच्या कारणावरून शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७) या महिलेस चाकूने भोकसून खून केल्याची घटना नंदेश्वर येथे रविवारी ( दि. २३) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसानी युद्धपातळीवर तपास करून अवघ्या सहा तासात आरोपीला जेरबंद केले.
दादा उर्फ राजाराम बाबूराव शेजाळ, असे या आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत दरोडेखोरांनी खून केल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या खूनाचा छडा लावला.
शाकूबाई कोकरे हिचा गळयावर चाकूने वार करून अज्ञात दरोडेखोरांनी खून केल्याची माहिती मंगळवेढयाच्या डीवायएसपी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कोकरे हिच्या गळयावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे व तिथे रक्ताने माखलेले अंथरून, कपडे आणि धारदार चाकू आढळून आला.
–आरोपी आणि त्याच्या पत्नीच्या जबाबात तफावत
दरम्यान, कोकरे हिच्या घरातून दरोडेखोर पळून जाताना दिसून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तर आरोपी शेजाळ व त्याच्या पत्नीच्या बोलण्यात तफावत आढळून आली. परिणामी पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता शेजाळ याचे नावे असलेली पाच एकर जमीन नावे करण्यासाठी अंगठा देत नसल्याच्या कारणावरून चाकूने गळयावर वार करून कोकरे हिचा खून करून अज्ञात चोरटयाने खून केल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
-पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
आरोपीने खूनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील व अन्य पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.