कुमारी मातांचा टक्का वाढतोय, ५ वर्षांत आढळली 2,550 प्रकरणे
यवतमाळ जिल्हा कुमारी मातांच्या समस्येसाठी ओळखला जातो. विशेषतः आदिवासी समाजात, बाह्य व्यक्तींकडून होणारे लैंगिक शोषण आणि बालविवाहामुळे कुमारी मातांची संख्या वाढली आहे. या भागात ही मोठी सामाजिक समस्या आहे. आता ही समस्या 90 टक्के साक्षर असलेल्या नागपुरातही पोहोचली असल्याचे कुमारी मातांच्या संख्येवरून दिसून येत आहे. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत 2,550 कुमारी माता आढळून आल्या आहेत.
Accident News : मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने 2 जणांना उडवले
अनधिकृत आकडेवारी यापेक्षा जास्त असण्याची शक्यता असून शहरात सामाजिक आरोग्य बिघडल्याचे अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ही आकडेवारी वाढत आहे. अलिकडेच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केलेल्या अभ्यासात अविवाहित महिलांमध्ये गर्भवती होण्याचे म्हणजेच कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले आहे. श्रीनगर येथे अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत डॉ. अविनाश गावंडे यांनी या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले असून ते सामाजिक चिंता वाढविणारे आहे. त्यांच्या निष्कर्षाला महापालिकेच्या आकडेवारीनेही बळ दिले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2021 या सव्वा वर्षांत 280 कुमारी मातांची संख्या नोंदविण्यात आली. मात्र, त्याच्या पुढील एका वर्षात अर्थात 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षी 30 टक्क्यांनी कुमारी मातांची संख्या वाढली. 2022-23 या वर्षांत ही संख्या 40 टक्क्यांनी वाढली. यवतमाळच्या तुलनेत नागपुरात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. असे असूनही शहरात कुमारी मातांची वाढत असल्याने शहराचे सामाजिक आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे.
अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक शासकीय मेडिकल रुग्णालयातील जानेवारी 2023 ते 2024 या काळातील गर्भवतींची प्रकरणे अभ्यासण्यात आली होती. या प्रकरणात 124 पैकी 67 मुली या अल्पवयीन असल्याची माहीती उघडकीस आली होती. 18 ते 21 वयोगटात 30, 22 ते 25 वयोगटात 21आणि 25 वर्षांवरील अविवाहित गर्भधारणेची 6 प्रकरणे आढळून आली होती. अर्थात 18 वर्षांखालील मुलींची टक्केवारी यात अधिक होती. त्यामुळे शहरातील तरुणी कुठल्या मार्गाने चालल्या आहेत, असा चिंता वाढविणारा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यातील 41 महिला अशा होत्या, ज्यांना गर्भभारणा होऊन सात-आठ महिने झाल्याने गर्भपात करता आला नाही.
याच 2025 वर्षात एप्रिल या एकाच महिन्यांत 75 कुमारी मातांची नोंद करण्यात आली. गेल्या पाच वर्षांतील काळाचा विचार केल्यास एका महिन्यात 30 ते 50 पर्यंत कुमारी मातांची संख्या होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीलाच कुमारी मातांच्या संख्येने 75 ही संख्या गाठल्याने या वर्षातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे. एकीकडे वर्षानुवर्षे यवतमाळसारख्या जिल्ह्यात कुमारी मातांच्या समस्येवर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्यासाठीचे अनेक उपक्रम, प्रस्ताव अजूनही धुळखात असताना राज्याच्या उपराजधानीत वाढणारी संख्या भविष्यातील मोठ्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवत आहे.