पेंच नदीच्या कुशीत दडलीय संस्कृती, प्राचीन शिलाश्रयांची कहाणी, राणी घाटची रहस्यमयी गुहा प्राचीन इतिहासाची साक्ष
नदी परिसरात मानव जीवन आणि संस्कृतीचा विकास झाला. आजही त्याचे ठसे नदी घाटात दिसून येतात. पेंच नदी घाटीतील राणी घाट परिसरातील प्राचीन गुहा आणि त्याचा इतिहास अत्यंत जूना आहे. मात्र, या गुहा आणि त्या भागाचा इतिहासाबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत.मध्य प्रदेशातील जुन्नरदेव तालुक्याच्या रिच्छेडा गावाजवळील पेंच नदीवरील राणी घाट भागात टेकडीत खोदलेली साधारणपणे 2 मीटर x 2 मीटर व उंची साधारणतः 1 ते दीड मीटर असलेली एक गुहा आहे. शिवाय, या भागात काही आंशिक नक्षीदार गुहा आणि शिलाश्रयही आढळतात. नदीच्या तळाशी डोह आणि नैसर्गिक खड्डे देखील आहेत.
Nirjala Ekadashi: कधी आहे निर्जला एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत
इतिहासावरून असे समजते की, प्राचीन काळात या छोट्या गुहा अशा ठिकाणी बनवण्यात आल्या होत्या की, जिथे पाण्याची कायमस्वरूपी सोय होती. पारशिवनी परिसरातील पेंच नदीच्या तळाशीच घोगरा महादेव भागाजवळ अशाच प्रकारचा नैसर्गिक खड्डा आढळतो. या रहस्यमयी गुहा आणि परिसरातील नैसर्गिक रचनेमुळे पेंच नदीच्या कुशीत प्राचीन जीवनशैली आणि आदिवासी संस्कृती दडली असल्याचे दिसून येते. पेंच नदीची वन घाटी खनिजसंपदांनी समृद्ध असून ही मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात स्थित आहे. डब्लूसीएल क्षेत्रातील अनेक खुल्या खाणी खोदकामानंतर धोकादायक अवस्थेत रिकाम्या पडल्या आहेत. यासंदर्भातील इशारे देणारे सूचना फलकही अनेक ठिकाणी दिसून येतात. वरील भागातील नदी घाटीमध्ये अनेक आदिवासी जमाती व स्थानिक रहिवासी त्यांच्या पारंपरिक रितीरिवाज, श्रद्धा आणि आस्थेने जीवन जगताना दिसतात. त्यांच्यापूर्वजांची स्मृती जपण्यासाठी या घाटीतअर्ध-लांबटीच्या लहान प्रतिमा बनवण्याची प्रथा आहे. मध्ययुगीन स्मृतीशिल्पे आणि काही आधुनिक छोट्या प्रतिमा देखील नागपूर येथील वेध प्रतिष्ठानच्या शोधकर्त्यांना त्यांच्या शोधकार्यादरम्यान येथे मिळाल्या आहेत.
ग्रामीण भागात आजही पारंपरिक लाकडी आणि कवेलू छत असलेली घरे प्रचलित असून ती पाहायला मिळतात. घरासमोर स्वच्छ, सुंदर आंगण आणि लाकडी खांबांसह वन्हांडा विशेष लक्ष वेधून घेतो. मात्र, विकासाच्या प्रवाहात आधुनिक शैलीतील इमारती देखील येथे दिसून येतात. घाटीतील लोक अतिथ्यशील आहेत आणि त्यांनी शोधकर्त्यांना सहकार्य केले आहे. पेंच नदीवरील पहिले मोठे धरण म्हणजे माचागोरा (चौराई) धरण. या धरणाची उंची सुमारे 44 मीटर असून त्यात 8 दारे आहेत. या धरणाच्या पाण्यामुळे छिंदवाडा व सिवनी जिल्ह्यांच्या 316 गावांना शेती, पिण्यासाठी व उद्योगांसाठी पाणीपुरवठा होतो. तसेच, या धरणापासून पाणी विद्युत प्रकल्पासाठी देखील दिला जातो.
पेंच नदी ही प्राचीन संस्कृतीसह आधुनिक मानव विकासाची संकल्पना साकारते. वेध प्रतिष्ठान नागपूर आयोजित पेंच नदी शोधयात्रेत सहभागी होणाऱ्यांमध्ये डॉ. मनोहर नरांजे, खुशाल कापसे, डॉ. अश्विन किनारकर, डॉ. लोकेश तमगिरे, ओंकार पाटील, कृष्णा चावके, घनश्याम भडांगे, राजेश माहुरकर, कमलेश सोनकुसळे, पिंटू कळवदे यांचा समावेश आहे. हे शोधकर्ते जिल्ह्यातील अशाच प्राचीन वारशांचा शोध घेत दडलेली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धी उघड करण्याचा प्रयत्न करीत आहेत.