Nanded News: नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत
महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीत भाजपाने सुरुवातीला आघाडी घेतल्याचे चित्र होते. स्थानिक पातळीवरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले, निरीक्षक व प्रभारी यंत्रणा कार्यरत झाली; मात्र उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यावरच युतीचा पेच निर्माण झाला. भाजप-शिवसेना युतीसंदर्भात दोन फेऱ्यांच्या चर्चा होऊनही अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे दोन्ही राज्यसभा सदस्य, संघटन मंत्री – संजय कौडगे आणि खासदार अजित डॉ. गोपछडे मंगळवारी मुंबईत होते. त्यांनी नांदेड मनपा निवडणुकीच्या प्रभारी व राज्याच्च्या मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. इच्छुक उमेदवारांची प्रभागनिहाय यादी, माजी नगरसेवकांची माहिती आणि पक्षातील ज्येष्ठ निष्ठावंतांची स्थिती त्यांनी मुंडेंसमोर मांडली.
युतीच्या चर्चेला वेगळे वळण देत राज्यातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेही भाजपसोबत युतीचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने अधिक जागा घ्याव्यात आणि त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात जागावाटप व्हावे, अशी मांडणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली. मात्र भाजपातील अंतर्गत नाराजी, मागील निवडणुकांचे अनुभव आणि स्थानिक राजकारण पाहता ही मांडणी फारशी सकारात्मक वाटत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने “आम्ही सर्व २० प्रभागांतील ८१ जागा स्वबळावर लढवण्याची तयारी ठेवली आहे,” असे स्पष्ट करत भाजपाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. मित्रपक्षांना सोबत न घेता एकट्याने निवडणूक लढविल्यास त्याचा फटका भाजपालाच बसेल, असा थेट इशाराही पोकर्णा यांनी दिला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे चित्रही तितकेच धूसर आहे, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे पक्ष सध्या स्वतंत्रपणे तयारी करत असल्याचे दिसून येते. इच्छुकांच्या मुलाखती, प्रभागनिहाय चाचपणी सुरू असून आम्ही सज्ज आहोत असा संदेश दिला जात आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक असल्याचे समजते. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नांदेड येथे काँग्रेससोबत आघाडीबाबत अनुकूलता दर्शवली असली, तरी त्या दिशेने अद्याप ठोस पाऊल पडलेले नाही.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रमुख पदाधिकारी मुंबईत असून गुरुवारी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसने प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांची चाचणी सुरू केली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची स्थिती अधिकव अडचणीत दिसत आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवण्यात अपयश आल्यामुळे मनपा निवडणुकीत या गटाचे स्वतंत्र अस्तित्व कुठे दिसेल, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याच पाश्र्वभूमीवर भाजपातील स्थानिक नेते जर एकसंध भूमिका घेत असतील, तर काँग्रेसशी बेट चर्चा करून नव्या प्रकारचा जागावाटपाचा प्रयोग करता येईल का, यावर राष्ट्रवादीत अंतर्गत मंथन सुरू आहे. काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
एकूणच, नांदेड मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच युतीचा पेच, पक्षांतर्गत नाराजी, स्वबळाच्या घोषणा आणि गुप्त बैठका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. युती होणार की स्वबळावर लढाई रंगणार, याचा फैसला अद्याप गुलदस्त्यातच असून, या निर्णयावरच नांदेडच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
आघाडीबाबत अजून काही निर्णय झाला नसून आप आपल्या परीने बाचपणी सुरू आहे. काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, मनपाची निवडणूक जोरदारपणे लढविण्याची तयारी काँग्रेसने केली असून येत्या ३० तारखेपर्यंत आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असून जागावाटपावरून बोलणी सुरू आहे. केवळ ६ जागा शिवसेनेला देण्यात येतील, असे भाजपकडून सांगण्यात आले होते, त्यामुळे युतीची बोलणी पुढे झाली नाही, शिवेसेनेला किमान ३० जागा द्याव्यात, अशी अपेक्षा आहे, याबाबत उद्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली.






