देशभरातील नागरिकांना स्लीपर वंदे भारत ट्रेनची प्रतिक्षा असून लवकरच या ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यात खुर्ची आसन असलेल्या वंदे भारत ट्रेन धावत आहेत. याच दरम्यान अजून एक आनंदाची बातमी समोर आलीय. या महिन्यात अजून दोन वंदे भारत ट्रेन रुळावर धावणार आहेत. या ट्रेनमध्ये २० डबे असणार आहेत. सध्या १६ आणि ८ कोच असलेल्या ट्रेन रुळावर धावत आहेत.
आता या ट्रेनमधील कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोच जास्त असलेल्या ट्रेन दोन मार्गावर धावणार आहेत. ‘ईटी नाऊ’च्या अहवालानुसार, ही २० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सध्या धावणाऱ्या १६ डब्यांच्या वंदे भारतची जागा घेईल. या दोन गाड्या दक्षिण रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे झोनसाठी सोपवण्यात आल्या आहेत. म्हणजेच या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी २० डब्यांच्या वंदे भारत गाड्या चालवल्या जातील. या दोन २० डब्यांच्या वंदे भारत ट्रेन तिरुअनंतपुरम सेंट्रल-कासारगोड आणि विशाखापट्टणम-सिकंदराबाद मार्गावर धावतील.
यामुळे या गाड्यांची आसनक्षमता आता ११२८ वरून १४४० झालीय. तिरुवनंतपुरम सेंट्रल-कासारगोड वंदे भारत ट्रेनचा क्रमांक २०६३४/ २०६३३ आहे आणि ती ५८८ किलोमीटरचा प्रवास ८ तास पाच मिनिटांत पूर्ण करते. ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असणार आहे. आठवड्यातील गुरुवार वगळता इतर दिवस धावते. ही ट्रेन क्रमांक २०६३४ त्रिवेंद्रम सेंट्रल येथून ०५.१५ वाजता सुटते आणि १३.२० वाजता आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचते. तर ट्रेनचा परतीचा प्रवास कासरगोडपासून दुपारी दीड वाजता सुरू करते.
रात्री २२.४० त्रिवेंद्रम सेंट्रलला पोहोचते. तर दुसरी ट्रेन विशाखपट्टणम -सिंकदराबाद मार्गावर धावेल. ही ट्रेन ६९९ किलोमीटरचा प्रवास करते. हा प्रवास ८.३५ तासात पूर्ण करते. पुण्यात लवकरच चार नव्या अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन धावणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘पुणे ते हुबळी’ आणि ‘पुणे ते कोल्हापूर’ या दोन वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून सुटतात. मात्र या ट्रेनचं प्रवास भांडे अधिक असल्याने प्रवासी या ट्रेनला पसंती देत नाहीत.
त्यामुळे प्रवाशांची ही समस्या लक्षात रेल्वे विभाग पुण्यात नव्यानं अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने जुलै २०२३ मध्ये अहमदाबाद ते गांधीनगर अशी पहिली अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन लॉन्च केली होती. अमृत भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनसारखीच असते. पण त्यात एसीची सोय नसते आणि त्याच्या तिकीटाचे दर तुलनेने कमी असतात.