गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शीख धर्मातील महान त्याग आणि बलिदानाची आठवण जागवणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शहरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
मोदी मैदान येथे आयोजित भव्य समारंभात ‘बोले सो निहाल सत श्री अकाल’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘वाहे गुरू वाहे गुरू’च्या अखंड नामस्मरणाने कार्यक्रमस्थळाचे वातावरण अत्यंत पवित्र व मंगलमय झाले होते. शीख बांधवांसह विविध धर्म व समाजातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या शहीदी समागमात सहभाग नोंदवला. या सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खासदार अजित गोपछडे, आमदार बाबुसिंह महाराज, आमदार तुषार राठोड, माजी आ. अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आ. आनंदराव बोंढारकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी
५२ एकर जागेत होतोय भव्य सोहळा
यावेळी अनेक संत, महंत, साध्वी यांची उपस्थिती होती. मोदी मैदान येथे ५२ एकर जागेत भव्य सोहळा पार पडत आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर नेते या सोहळ्यास हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केले. सत्य, न्याय आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वधर्मसमभाव, बंधुता आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी गुरुजींच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड शहरात धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रभावी दर्शन घडले. कीर्तन, अरदास आणि लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव व समतेचा संदेश देण्यात आला. श्रद्धा, इतिहास आणि एकतेचा संगम ठरलेला हा सोहळा नांदेडकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.
गर्दीने परिसर फुलला
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये ठिकठिकाणी लंगर सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, केळी, थंड सरबत यांचे मोफत वाटप केले जात असून वैद्यकीय सेवेचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी मैदानावर भव्य शामियाने उभारण्यात आले असून देश-विदेशातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर अक्षरशः फुलून गेला आहे. शीख बांधवांच्या सेवाभावी परंपरेचे दर्शन या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने सुरळीत वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM
श्री गुरुग्रंथ साहिबजी विराजमान
असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.
विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुवाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.
सहिष्णुतेचा संदेश देणारा सोहळा
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात – उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून – येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी – पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






