मालेगावी भाजपचा सुपडासाफ; MIM ला २० जागा; पश्चिम भागात शिवसेनेने महानगरपालिकेचा गड राखला!
मालेगाव: मनपाच्या २१ प्रभागांच्या ८४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी (१६ जानेवारी 2026) निकालात पश्चिम भागात इस्लाम पार्टीने ३४ व समाजवादी पार्टीने ६ म्हणजेच मालेगाव सेक्युलर फ्रंटने ४० जागांवर विजयश्री खेचून आणली तर पूर्व भागात शिवसेनेने १८ जागा जिंकत भाजपाचा सुपडासाफ केला आहे.भाजपाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, व १२ पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला देखील खाते उघडता आले नाही.
पूर्व भागात इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख व समाजवादी पार्टीचे मुस्तकीन डिग्निटी यांनी गड राखला आहे तर पश्चिम भागात शिक्षणमंत्री दादा भुसे व युवा नेते अविष्कार भुसे यांचा करिश्मा कायम असल्याचे दिसून आले. भाजपाच्या अंतर्गत गटबाजी व हेवेदाव्यांमुळे भाजपाला धक्काधायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांसाठी निवडणूक पार पडली. मात्र माघारीच्या प्रक्रियेत इस्लाम पार्टीचे एक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे ८३ जागांसाठी निवडणूक पार पडली.
पश्चिम भागात शिवसेना, भाजपमध्ये सरळ लढत झाली. शिवसेनेने २४ उमेदवार रिंगणात उभे केले होते. त्यापैकी १८ उमेदवार विजयी झाले आहे तर भाजपने पश्चिम भागात २५ उमेदवार रिंगणात उतरविले होते त्यापैकी केवळ २ उमेदवारांना विजय संपादन करता आला. तब्बल भाजपच्या २३ उमेदवारांना पराभवाचे धनी व्हावे लागले, तर पूर्व भागात इस्लामपार्टी व समाजवादी पार्टीने एकत्र येत स्थापन केलेल्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने ४० जागा जिंकून मनपात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर प्रतिस्पर्धी एमआयएमने ६१ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी केवळ २० उमेदवार निवडून आले आहेत. एमआयएमच्या ३१ उमेदवारांचा पराभव झाला. तर काँग्रेसने १९ उमेदवार रिंगणात उतरविले होते. काँग्रेसला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला. त्यांच्या १६ उमेदवारांना दारून पराभव झाला. धक्कादायक निकालामुळे काही राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
काँग्रेसच्या तत्कालीन महापौर व इस्लाम पार्टीच्या उमेदवार ताहेरा शेख या देखील विजयी झाल्याने त्या पुन्हा सभागृहात दाखल होणार आहे. शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर व या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केलेले नरेंद्र सोनवणे यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणल्यामुळे ते पुन्हा सभागृहात दाखल झाले आहे. निलेश आहेर यांनी भाजपचे युवा नेते दीपक गायकवाड यांचा दारूण पराभव केला तर नरेंद्र सोनवणे यांनी माजी नगरसेवक गुलाब पगारे यांना आसमान दाखविले. या लढतींकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते.
मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून मालेगाव सेक्युलर फ्रंट पुढे आला आहे. त्यामुळे मालेगाव महापालिका महापौरपदाचा दावा मालेगाव सेक्युलर फ्रंटचा संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख यांनी केला आहे. आता महापौर पदाच्या निवडणुकीत मालेगाव सेक्युलर फ्रंट कोणाला सोबत घेत याकडे लक्ष लागून आहे.
इस्लामपार्टी: ३५,
एमआयएम २०,
शिवसेना: १८,
समाजवादी: ६,
काँग्रेस ३, भाजप २ असे एकूण ८४.






