सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, भाविकांची अलोट गर्दी; नियोजन चुकलं अन्… (फोटो सौजन्य-X)
Nashik Saptashrungi Stampede : नाशिकमधील सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे नियोजन चुकलं आणि त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
बुधवारी रात्रीपासूनच चैत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चेंगराचेंगेरीजवळील पहिल्या घाटाजवळ अचानक गर्दी वाढल्याने परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीमुळे पोलिस, आपत्कालीन व्यवस्थापन आणि मंदिर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. या चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. अशा प्रकारच्या गर्दीमध्ये भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मंदिर प्रशासनाचा हा नियोजनशून्य कारभार पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी रात्रीपासून सप्तश्रृंगीगडावर भाविकांचे लोंढेच्या लोंढे पोहोचले. गुरुवारी पहाटे पाच वाजेनंतर भाविकांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झाला. भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असते. मात्र, गर्दी वाढल्याने काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिणामी भाविकनी मंदिर प्रशासनाने नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
मंदिराच्या घाभाऱ्यापासून ते पाटील चौक दवाखाना आणि प्रतीक्षालयापर्यंत कुंपण उभारण्यात आले. पण, प्रतीक्षालयात एकही पोलिस कर्मचारी नसल्याने, तिथे वाट पाहणाऱ्या लोकांची गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली. हे बॅरिकेड्स जुनी आणि मोडकळीस आल्याने गर्दीच्या प्रेशरने त्या तुटल्या. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. गर्दी होणार आहे हे माहित असतानाही मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी त्यासाठी काहीही तयारी केली नसल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.






