संग्रहित फोटो
कोल्हापूर : कोणत्याही प्रकल्पाला विरोध असतो, तो विरोध हिताचा आहे का? बघायला हवं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केलीय. सरकारनं पटवून द्यायला हवं, दोन्ही बाजू समजावून घ्यायला हव्यात, शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारची बाजू ऐकायला हवी, असं मत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज्यात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादंगावर भाष्य करीत शरद पवारांनी पहिली ते चौथी प्राथमिक शाळेत इथं हिंदीची सक्ती योग्य नाही, पाचवीच्या पुढं हिंदी भाषा असायला हवी, हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, मात्र हिंदी लादनं योग्य नाही, ठाकरे बंधू हिंदी विरोधात आहेत, त्यांना मुंबईला गेल्यावर भेटणार आहे, असंही शरद पवार म्हणाले. मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात पवार म्हणाले की, तुम्ही सांगता म्हणून सहभागी होता येणार नाही, पण मुद्दा हिताचा असेल तर जरूर विचार करायला हवा, असं मत खासदार शरद पवारांनी व्यक्त केले, कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, मतभेद विसरून चांगलं काम होत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केंद्र सरकार बाजू मांडण्यासाठी विलंब करीत आहे, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, या कमिटीत जयंत पाटील आहेत, त्यांच्यावर जबाबदारी टाकावी, असं एकीकरण समितीचं मत आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेतली, सीमा प्रश्नावर लवकरच मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचंही शरद पवार म्हणाले. देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना एक वर्ष पूर्ण झालंय, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय मीच घेतलेत, असं मोदी सांगतात. मात्र त्यांची ही विधानं अस्वस्थ करणारी आहेत, निर्णय घेतले नसताना ते श्रेय घेतात, असेही पवार म्हणाले.
२५ जूनला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली होती, याला ५० वर्षे पूर्ण झाली. भाजपाकडून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, इंदिरा गांधींनी जनमत लक्षात घेऊन आणीबाणीबाबत देशाची माफी मागितली होती, तेव्हा जनता पक्षाचे सरकार होते, भाजपाच्या नेत्यांनी जनमत लक्षात घ्यावे, जनतेनं पुन्हा इंदिरा गांधींच्या हातीच सत्ता दिली, ज्यांच्या हातात सत्ता त्यांची विचारधारा लोकशाहीला पूरक नाही, केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली, सरकारची कामगिरी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. देशातील समस्या मांडण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागे पडत नाहीत, विरोधी पक्षनेत्यांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी सगळ्यांना ऊर्जा देणारी विधानं केली पाहिजेत, असंही शरद पवारांनी अधोरेखित केले. यावेळी व्ही. बी. पाटील, समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे, याबाबत विचारलं असता शरद पवारांनी स्वतःचा माईक कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांच्याकडे सरकवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला, पवारांच्या या कृतीची चर्चा कोल्हापुरात दिवसभर सुरू होती.