या भेटीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, पॅथोलॉजिस्ट डॉ संगीता बनसोडे यांनी कॅन्सर रजिस्ट्रीबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, कर्करोग नोंदणी विभाग दि.11 ऑक्टोबर 2024 पासून महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली सुरू असल्याचे सांगितले.
या विभागांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी असणा-या कर्करोग रूग्णांची नोंदणी करण्यात येते. या माध्यमातून नमुंमपा कार्यक्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रूग्णांची संख्या, कॅन्सरमुळे होणारे मृत्यू व कोणत्या प्रकारच्या कॅन्सरचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आहे. याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. भविष्यात सदर माहितीचा उपयोग कर्करोगविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा विकसित करण्याकरिता होणार आहे.
डॉ. मॅग्डालेना पॅच्कोन्स्की व डॉ अतुल बुडुख यांनी सर्व महानगरपालिकांमध्ये कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शासन/ महानगरपालिका संस्थामध्ये देखील ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे सांगत प्रशंसा केली व हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेकरिता कॅन्सर रूग्णांच्या नोंदणीसाठी टाटा ॲक्ट्रेक यांचेकडून मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार असून तेथील तज्ज्ञ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देणेकरिता शिफारस तसेच कॅन्सर रजिस्ट्रीचे आंतरराष्ट्रीय सदस्यत्व नवी मुंबई महानगरपालिकेस देणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असेही टाटाअॅक्ट्रेकचे ऑफिसर इनचार्ज डॉ अतुल बुडुख यांनी सांगितले.






