फोटो सौजन्य: गुगल
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान – माजी आमदार संदिप नाईक यांच्या समर्थकांनी नुकतंच वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश करत घरवापासी केली. मुख्य म्हणजे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांना पाडण्यासाठी जीवाचे रान केले होते. तर दुसरीकडे या नगरसेवकांना घेऊ नये यासाठी नाईक विरोधक नेते तसेच जुन्या भाजपातील पदाधिकाऱ्यांनी देखील जोर लावला होता. मात्र वरिष्ठांनी येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता पक्ष बळकट करण्यासाठी या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत एकप्रकारे जुन्या भाजपा पदाधिकारी व नेत्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यात आता आमदार मंदा म्हात्रे यांनी एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान ‘ कल का भूला वापस आये तो उसे भुला नहीं केहते ‘ असे वक्तव्य केल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोधाची तलवार म्यान केली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सीवूड्स दारावे येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे उद्धाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. एरव्ही जीभेचा पट्टा फिरवणाऱ्या ताई मैदानात बॅट फिरवताना दिसल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत क्रिकेटचा संबंध राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की,क्रिकेट खेळ मनाला आनंद देतो. कारण ज्यावेळी आपण चौकार व षटकार मारतो किंवा एखादा विकेट घेतो त्यावेळी लोकांमध्ये आनंद वेगळा असतो. त्यावेळी टाळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन जो विकेट घेतो किंवा षटकार मारतो त्याचं स्वागत करतं असतात. तसेच क्रिकेट खेळताना फोर सिक्स मारतो. हुतूतू खेळताना पाय ओढतो. हे खेळ राजकारणाशी काहीसे संबंधित आहेत. यावेळी मी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला असे म्हणताना, आ. म्हात्रे यांनी तुतारीमधून प्रवेश केलेल्या संदिप नाईक समर्थकांवर देखील भाष्य केले.
यावेळी ताई काहीतरी आक्रमक भूमिका घेतील असा कयास बांधला जात असताना, आ. मंदा म्हात्रे यांनी एकप्रकारे सामंजस्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली.त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी तुतारीमध्ये गेलेले माजी नगरसेवक भाजपामध्ये परतले आहेत. “कल का भूला घर वापस आये तो उसे भुला नहीं केहते” असे त्या म्हणल्या.हे वक्तव्य आमदार म्हात्रे यांनी त्यांच्याच विरुद्ध केलेल्या माजी नगरसेवकांविरुद्ध केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे निवडून आल्यावर कोणत्याही नगरसेवकाला पुन्हा भाजपात प्रवेश मिळणार नाही असे म्हणणाऱ्या, मंदा म्हात्रे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यापुढे मंदा म्हात्रे म्हणाल्या की, भाजपने पुन्हा एकदा या नगरसेवकांना संधी दिली आहे. आता त्यांनी संधीचा चांगला वापर करावा. विरोधी कामे करू नयेत. त्यांनी पक्ष संघटना वाढवावी एवढेच माझे म्हणणे आहे असे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी आपली विरोधाची तलवार म्यान केली की वरिष्ठांनी तसे आदेश दिले आहेत? त्यामुळे एकीकडे क्रिकेट कबड्डीची सांगड राजकारणाशी घालणाऱ्या मंदा ताईंनी मांडलेली ही सामंजस्याची भूमिका बुद्धिबळाचा डाव तर नव्हे अशी चर्चा रंगली आहे.