मुंबई महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेस स्वबळावर लढणार (फोटो - ट्विटर
मुंबई: गेल्या वर्षी राज्यात महराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. मात्र राज्यातील जनतेने महायुतील स्पष्ट कौल दिला. राज्यात महाविकास आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्यातसुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील देखील लढत महत्वाची ठरली. विधानसभा झालयानंतर सर्व पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मात्र आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात मुंबईत पक्षाची एक बैठक झाल्याचे समजते आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचा या बैठकीत मुंबई महापलिकेच्या 50 पेक्षा जास्त जागा लढवण्यवार विचार झाल्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक लढण्यास जे इच्छुक असणार अहेवत, त्यांच्या मुलाखतीचे देखील लवकरच आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत पक्ष किती जागा लढवू शकतो आणि या निवडणुकीसाठी पक्षाची किती तयारी पूर्ण झाली आहे याचा आढावा घेणारी ही बैठक होती.
ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ काँग्रेसचेही स्वबळाचे संकेत
शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा आधार घेत स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत सूचक विधान केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज ऐकणे आणि त्यांना संधी देणे ही पक्षाची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ, असे गायकवाड म्हणाल्या.
महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता
वर्षा गायकवाड यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे आणि काँग्रेसकडूनही असे संकेत आल्याने आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी संधी हवी आहे. मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना नेहमीच संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल”.
हेही वाचा: ‘ते सोबत नाही आले तर आमचाही मार्ग मोकळा’; काँग्रेसचेही स्वबळाचे संकेत
संजय राऊत यांच्या ‘एकला चलो रे’मुळे काँग्रेस नेते बॅकफूटवर आले असून, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. संजय राऊत मोठे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली असली तरीही आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. आपण एकत्र लढू अशी त्यांना विनंती करू. ते सोबत नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.