फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्याचे राजकारणे जोरदार रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून खडाजंगी सुरु आहे. लवकरच विधानसभा निवडणूका देखील होणार आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले. पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे रंजक ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या चर्चेत आले आहे. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्यामधील सरकारी वकिलांच्या भूमिकेवरुन आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी 6 तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची बाजू मांडणार आहे, असे सत्र न्यायालयात सांगितले. खास वकील आणण्याचे ‘खास’ कारण काही समजलेले नाही. पण, यातून सरकारचा हेतू आणि सरकारची सूडाची भावना ही काही लपून रहात नाही. जेवढे खोटे करायचे तेवढे खोटे या सरकारने आणि ठाणे पोलिसांनी केले अन् अजूनही करीत आहेत आणि सांगताना मात्र , “आम्हाला काही माहितच नाही; आमचा काही संबंधच नाही,” असे म्हणत असतात. महत्वाचे म्हणजे, केस लिहिताना आपण काय लिहित आहोत हेच त्यांना माहित नसते, अशी अवस्था ठाणे पोलिसांची झाली आहे. आपली अनभिज्ञता की आपली हतबलता हीच त्यांना कळत नाही.”
मला माहित नव्हते की, हे सरकार मला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देणार आहे. सूडाग्नीने पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ६ तारखेला विशेष सरकारी वकिलांनी मी या गुन्ह्य़ाच्या खटल्यात सरकार / पोलिसांची…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 8, 2024
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “असो, त्याच्याने फारसा फरक पडत नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज सासूचे तर उद्या सुनेचे दिवस येणारच आहेत. वक्त वक्त की बात है, वक्त सभी पे आता है. चलो, रूकते है, देखते है, कितना दिन चलेगा. सरकारचे अभिनंदन, मला वाढदिवसाला एवढी चांगली भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार. मला वाढदिवसानिमित्त एवढी चांगली भेट दिली. पुरोगामी महाराष्ट्राच्या हितासाठी लढायला ईश्वर मला आणखी शक्ती देवो, एवढीच आई भवानी चरणी प्रार्थना. लडने से कौन डरता है!” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.