संग्रहित फोटो
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अभूतपूर्व राजकीय खळबळ उडाली आहे. “पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे. पुण्यामध्ये बुधवारी (दि. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींमुळे गारटकर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला असून, “पक्षाने आमचं मत न ऐकलं, तर मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन आणि स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरू!” असा इशारा त्यांनी दिला.
जनतेच्या विश्वासावर राजकारण व्हायला हवं
गारटकर म्हणाले, “मी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा मला ७५ हजार मते मिळाली होती. मी अनेक विरोधकांचे वैर पत्करून दत्तात्रय भरणे यांना आमदार केलं. आज तेच अहंकाराने वागत असतील, तर हे योग्य नाही. पैशाच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर राजकारण व्हायला हवं.” ते पुढे म्हणाले, “पक्षाने योग्य सन्मान ठेवला, आमचं ऐकलं, तर आम्ही पक्षासोबत आहोत. पण अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. जर आमच्याविरोधात पक्षाने निर्णय घेतला, तर नैतिकतेच्या भूमिकेतून मी राजीनामा देईन,” असंही गारटकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
इंदापुरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
या घटनाक्रमामुळे इंदापूरचे राजकारण तापलं आहे. गारटकर गटाचा हा आक्रमक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मोठी राजकीय डोकेदुखी ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष लागले आहे की, पक्ष या वादाचा निकाल कसा लावतो आणि आगामी निवडणुकीवर या संघर्षाचा काय परिणाम होतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






